छत्रपती संभाजीनगर : टेनिस खेळून घरी परतणाऱ्या एका भरधाव कारचालकाने काळा गणपती मंदिरासमोर पाच जणांना चिरडले. ज्या मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती, त्याच मंदिरासमोर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.4) सकाळी सिडको एन-१ परिसरात घडली. या भीषण अपघातात मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एका वाटसरूचा देखील मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी कारचालक प्रशांत मगर याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक प्रशांत एकनाथ मगर (वय ३०, रा. सिडको) हा गारखेडा येथील क्रीडा संकुलातून टेनिस खेळून आपल्या स्विफ्ट डिझायर कारने (MH-20-HH-0746) घरी परतत होता. काळा गणपती मंदिरासमोरील वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात गाडी चालवत रस्त्यावरील वाहनांना आणि पादचाऱ्यांना उडवले. या अपघातात काळा गणपती मंदिराचे ७० वर्षीय सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे यांचा मृत्यू झाला. तर मनीषा विकास समधाने (वय ४०), विकास समधाने (वय ५०), रवींद्र भगवंतराव चौबे (वय ६५) आणि श्रीकांत प्रभाकर राडेकर (वय ६०) हे व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी समधाने दाम्पत्याला जवळच्या खासगी रुग्णालयात, तर चौबे आणि राडेकर यांना मिनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सिडको एन १ भागातील पिरॅमिड चौकाकडून कारचालक काळा गणपती मंदिर रस्त्याने भरधाव वेगात येत होता. त्याने गणपती मंदिरच्या बाजूला असलेल्या साकोळकर हॉस्पिटल समोरची वाहने उडविली. तेथून पुढे मंदिरात फुलविक्री करणाऱ्या महिलेला सोडून परत निघालेल्या तिच्या पतीला चिरडले. त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या आणि रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना चिरडून कार मंदिराच्या पायऱ्याला धडकून पुढे गेली. कारचालकाने एक नो पार्किंगचा खांब उडविल्यानंतर ब्रेक दाबले. तोपर्यंत पाच ते सहा जणांना त्याने धडक देऊन गंभीर जखमी केले होते.
कार चालकाचे आडनाव मगर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने पाच जणांना उडविल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. भीषण घटनेमुळे भाविकांसह परिसरातील लोकांनी आरडाओरड केली. जखमींच्या मदतीसाठी धावपळ करत होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णवाहिकेमधून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश आणि गोंधळ उडाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. पोलिसांनी चालक प्रशांत मगर याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.