छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Accident |लोखंडी खांब ठरला तारणहार : अन्यथा बस थेट १५० फूट दरीत, ५० प्रवासी थोडक्यात बचावले!

पाच महिला जखमी, औट्रम घाटातील थरारक घटना, बस कठड्याला धडकून थांबली

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : कन्नड-चाळीसगाव राष्ट्रीय मार्गावरील औट्रम घाटात दी. २३ रविवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर आगाराची बस वळण रस्त्यावर कठड्याला धडकून अपघात झाला. मात्र कठड्यालगत असलेल्या लोखंडी पाईपच्या खांबाला बस अडकल्याने ती सुमारे दीडशे ते दोनशे फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. त्यामुळे बसमधील जवळपास ५० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला असून लोखंडी खांबच प्रवाशांसाठी तारणहार ठरल्याची चर्चा घटनास्थळी होती.

छत्रपती संभाजीनगर आगाराची बस क्र. एमएच-४० एन-९७२६ ही संभाजीनगरहून चाळीसगावमार्गे सुरतकडे जात होती. दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान बस औट्रम घाटातील तीव्र वळणावर आली असता तांत्रिक बिघाड झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली.

धडकेनंतर बस पुढे सरकत दरीच्या दिशेने झुकली होती. मात्र त्या ठिकाणी उभारलेल्या लोखंडी पाईपच्या मजबूत खांबाला बस अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करीत होते. अपघातानंतर काही प्रवाशांना खिडक्यांची काच फोडून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यावेळी शिवाजी आरखे व शरद देशमुख,घाटमित्र चांगदेव राठोड, करण राठोड आदींनी मदतकार्य केले.

प्रथमदर्शनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या अधिक होती. अपघातात पाच महिलांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली असून सर्व प्रवाशांना तत्काळ दुसऱ्या बस मध्ये बसून पुढील प्रवसाला रवाना केले. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चाळीसगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बस अपघात झाल्यावर कोणी स्टेअरिंग जाम झाले तर कोणी म्हणे चाकाचा अक्सल रॉड तुटल्याची चर्चा होती मात्र नेमक्या कोणत्या कारणाने बस धडकली याचा तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT