ब्रीजवाडी येथील शाळेच्या पाहणीवेळी अधिकाऱ्यांवर प्रश्नाची सरबती करताना पालक. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar school slab collapse : आधी मुलांना वाचवा, मग इमारत बांधा !

स्लॅब कोसळून विद्यार्थिनी जखमी : पालकांचा मनपा अधिकाऱ्यांना घेराव

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ब्रीजवाडी येथील महापालिका शाळेच्या जीर्ण इमारतीचा धोका अखेर समोर आला आहे. या शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब कोसळून गुरुवारी (दि.१०) पाचवीतील विद्यार्थिनी जखमी झाली. त्यानंतर शुक्रवारी (दि. ११) संतप्त पालकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी मुलांचे भवितव्य त्यांच्या शिक्षणात आहे, मात्र इमारतच जीवघेणी असेल तर शिक्षण कसे घ्यायचे? असा सवाल करीत पालकांनी प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. यावर शाळेसाठी नवीन जागेचा शोध सुरू आहे. तोपर्यंत कंटेनरमध्ये वर्ग सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी पालकांना दिले.

महापालिकेच्या ब्रीजवाडी येथील शाळेतील जीर्ण वर्गखोलीच्या छताचा भाग गुरुवारी दुपारी अचानक कोसळला. यात पाचवीत शिकणारी आश्विनी बल्लाळ हि विद्यार्थ्यांनी जखमी झाली. या घटनेनंतर शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे, शहर अभियंता संजय कोंबडे आणि विस्तार अधिकारी संजीव सोनार यांनी शाळेची पाहणी केली.

अधिकारी शाळेच्या पाहणीसाठी पोहोचल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक भगवान रगडे, जखमी विद्यार्थिनीचे पालक तसेच परिसरातील नागरिक शाळेत दाखल झाले. यावेळी पालकांनी धोकादायक इमारतीबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप केला. तसेच आज मुलगी जखमी झाली,

उद्या एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही पालकांनी उपस्थित केला. तर काही पालकांनी शिक्षक विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीच्या छतावर घेऊन जात असल्याचा आरोपही केला. दरम्यान, माजी नगरसेवक भगवान रगडे यांनी शाळेसाठी सुरक्षित ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून तेथे नवीन इमारत उभारण्याची मागणी केली.

पालकांच्या तीव्र नाराजीला सामोरे जाताना अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आणि शहर अभियंता संजय कोंबडे यांनी शाळेसाठी योग्य जागेचा शोध घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच नवीन इमारतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शाळेच्या परिसरात कंटेनर उभारून त्यामध्ये वर्ग भरविण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आम्हाला उशिरा का कळविले : वर्गखोलीचा स्लॅब कोसळून जखमी झालेल्या आश्विनीच्या आईला अधिकाऱ्यांसमोर अश्रू अनावर झाले. मुलीला गंभीर दुखापत झाल्यानंतरही पालकांना घटनेची माहिती उशिरा का देण्यात आली, असा सवाल त्यांनी केला. तर काही शिक्षकांनी आश्विनीला उपचारासाठी नेले, मात्र घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक कुठे होते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT