पैठण, पुढारी वृत्तसेवा: सौर पंप मंजुरीसाठी २० हजार रुपये लाच घेताना बिडकीन येथील महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश काशिनाथ घावट यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (दि.११) छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Bribe News)
याबाबत अधिक माहिती अशी की, टाकळी (ता.पैठण) येथील तक्रारदार यांच्या शेती शिवारात सौर पंपाचे ५ संच मंजूर करण्यासाठी अर्ज दाखल केले होते. यासाठी त्यांनी शासकीय फी भरलेली आहे. दरम्यान, मंजुरी देण्यासाठी बिडकीन महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश घावट यांनी २५ हजारांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते.
तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक केशव दिंड, नागरगोजे, आत्माराम पैठणकर, ताटे यांनी कारवाई करत घावट यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.