छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरातील जाबिंदा ग्राऊंडवर सोमवारी (दि. ३) मध्यरात्री आपल्या मृत कुत्र्याच्या पिल्लाला पुरण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांना अडवून, चाकू आणि रॉडचा धाक दाखवून टोळक्याने लुटले. गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची चेन आणि दुचाकीची चावी हिसकावून पसार झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात तीन लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रेम किशोर रेणापूरकर (२३, मूळ रा. गोपाळनगर, सांगवी, जि. नांदेड, सध्या रा. एन-६, सिडको) याच्या तक्रारीनुसार, तो एमजीएम रुग्णालयात 'फिजिओथेरपिस्ट' म्हणून इंटर्नशिप करत आहे. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास प्रेम आणि त्याचा मित्र प्रथमेश चंद्रकांत कुंटुरवाल हे दोघे त्यांच्या मृत कुत्र्याच्या पिल्लाला पुरण्यासाठी बुलेटवरून बीड बायपासवरील जाबिंदा ग्राऊंड येथे गेले होते.
ते तिथे असताना अचानक एका पिवळ्या रंगाच्या मोपेडवरून २० ते २२ वर्षे वयोगटातील तीन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. एक जण त्यातील गाडीवरच बसून राहिला, तर दोघांनी खाली उतरून प्रेम आणि प्रथमेशला थेट चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवला.
प्रेमच्या गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची चेन आणि त्यांच्या बुलेटची चावी हिसकावून घेतली. लूटमार केल्यानंतर तिन्ही चोरटे मोपेडवरून पळून जात असताना, प्रेमचा मित्र प्रथमेश याने त्याच्या मोबाईलमध्ये त्या चोरट्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे लक्षात येताच एका चोरट्याने प्रथमेशच्या पाठीत दगड मारून त्याला जखमी केले आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पोबारा केला. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत.