Chhatrapati Sambhajinagar crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : आपेगावात शेतकरी महिलेवर हल्ला करून दागिने लुटले

प्राणघातक शस्त्राचा धाक; प्रतिकार करताच डोळ्याखाली चावा घेऊन जखमी, तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण तालुक्यातील आपेगाव येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना शनिवारी (दि. २६) घडली. दागिने हिसकावण्यास महिलेने प्रतिकार केला असता एका चोरट्याने तिच्या डोळ्याखाली चावा घेऊन तिला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपेगाव येथील ताराबाई दिनकर ठेंनगे (वय ५०) या शनिवारी आगापूर शिवारातील गट क्रमांक १० मधील आपल्या शेतात सरकीला पाणी देत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी विचारपूस करण्याच्या बहाण्याने संवाद साधला.

काही वेळाने या तिघांनी प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवत ताराबाई यांच्या अंगावरील सोन्याची पोत आणि कानातील फुले हिसकावण्यास सुरुवात केली. यावेळी ताराबाई यांनी प्रतिकार केला. त्यावेळी एका चोरट्याने त्यांच्या डोळ्याखाली चावा घेतला. त्यानंतर चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन मोटारसायकलवरून पलायन केले.

घटनेनंतर ताराबाई यांनी कुटुंबीयांना तसेच पैठण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, बीट जमादार राजेंद्र जीवडे आणि शुभम पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या ताराबाई ठेंनगे यांच्यावर रविवारी पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग करीत आहेत.

शेतकरी महिलांमध्ये भीतीचे वातावरण

दुष्काळी परिस्थितीत शेतवस्तीवर एकट्या काम करणाऱ्या शेतकरी महिलांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT