अजिंठा : अजिंठा घाटातील दर्ग्याजवळ गुरुवारी रात्री ११:४५ वाजता ट्रकची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसून अपघात झाला. मंगल सरदार जाधव (वय ३८, रा. गोद्री तांडा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले. पहिल्या ट्रॉलीतील १७ कामगार सुदैवाने बचावल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी जाधव यांना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महिलांसह कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. अजिंठा घाट, फर्दापूर आणि घाटमाथ्यावर आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.
अवघड वळणावर ट्रकची ट्रॉलीला धडक
गुरुवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अजिंठा घाटातून उतरणाऱ्या अवजड मालवाहू ट्रक (क्र. एमएच १८ बीझेड ३५१५) चे दर्ग्याजवळील अवघड वळणावर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या पहिल्या ट्रॉलीला घर्षण झाले. त्यानंतर ट्रकची दुसऱ्या ट्रॉलीला जोरदार धडक बसल्याने ती रस्त्यात आडवी झाली. पहिल्या ट्रॉलीत १७ कामगार होते, तर दुसऱ्या ट्रॉलीत झोपलेल्या मंगल जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ऊसतोड कामगार आणि अजिंठ्यातील आरिफ खान या युवकाने त्यांना दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
गैरसमजातून एक तास कामगारांचे ठिय्या आंदोलन
अपघातानंतर गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कामगारांना ट्रॉली बाजूला करण्याची विनंती केली. मात्र, ट्रक हटविल्यानंतर अपघाताची नोंद होणार नाही, अशी भीती कामगारांना वाटली. त्यामुळे ट्रकचालकावर गुन्हा दाखल केल्याशिवाय एकही वाहन हलवू देणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केले. महिला कामगारांसह सर्वजण रस्त्यावर बसल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ट्रॉली हटविली
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी उपनिरीक्षक बाबासाहेब भवर, पोलीस कर्मचारी सागर फोलाने, जमील तडवी आणि रघुनाथ शिंदे यांना घटनास्थळी पाठविले. वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना पोहोचण्यासाठी अर्धा तास लागला. उपनिरीक्षक भवर यांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. तसेच, रुग्णवाहिकांना अडथळा आणि नाशवंत मालाचे नुकसान होण्याची शक्यता समजावून सांगितल्यानंतर कामगारांनी ट्रॉली बाजूला करण्यास सहमती दर्शविली.
दुसऱ्या ट्रकमुळे पुन्हा वाहतूक ठप्प
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका बाजूने वाहतूक सुरू झाली. मात्र, दुसरा ट्रक (क्र. टीएन ६१ एच ४११३) अपघातग्रस्त ट्रॉलीजवळून जाताना अडकल्याने पुन्हा सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली. अखेर ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून ती बाजूला करण्यात आली. यावेळीही कामगार आक्रमक झाले; मात्र पोलिसांनी परिस्थिती हाताळत वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला.
बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर
अपघातामुळे अजिंठा घाटात चार, फर्दापूर येथे दोन आणि घाटमाथ्यावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पहाटे तीन वाजता एका बाजूने वाहतूक सुरू झाली; मात्र वाहनचालकांनी एकाच रांगेत शिस्तीत जाण्याऐवजी पुढे जाण्याची घाई केल्याने कोंडीत भर पडली. सकाळी वाहतुकीची कोंडी पुन्हा झाली दोन ते तीन तास वाहनांच्या रांगेत अडकल्याने प्रवासी आणि पर्यटक हैराण झाले. अपघातानंतर नऊ तासांहून अधिक काळ उलटूनही शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत अजिंठा घाटातील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली नव्हती.