Chhatrapati Sambhajinagar airport  
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar airport|औद्योगिक विकास सुसाट, पण हवाई कनेक्टिव्हिटी सुस्तच

Chhatrapati Sambhajinagar airport international flights| औद्योगिक विकास सुसाट, पण हवाई कनेक्टिव्हिटी सुस्तच; संभाजीनगर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षाच

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर :

जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आणि गेल्या दोन वर्षांत मोठ्या उद्योगांची गुंतवणूक खेचून घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधून अद्याप एकही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू नसल्याने उद्योग व पर्यटन क्षेत्रात तीव्र नाराजी आहे. काही वर्षांपूर्वी जेद्दाहसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्याने चिकलठाणा विमानतळाला 'आंतरराष्ट्रीय' दर्जा मिळाल्याची चर्चा रंगली होती; मात्र सरकारी कागदपत्रांवर हे विमानतळ आजही 'डोमेस्टिक'च आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परदेशाशी थेट कनेक्टिव्हिटी देण्याची मागणी जोर धरत असताना, आम्ही आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सज्ज आहोत, मात्र केवळ इमिग्रेशन (स्थलांतर) सुविधा नसल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. अशी हतबलता विमानतळ प्रशासनाने व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगरला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान कनेक्टिव्हिटीची नितांत गरज आहे. सध्या येथून केवळ मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या चारच शहरांसाठी मोजकी विमाने उपलब्ध आहेत. या मर्यादित सेवेमुळे उद्योजकांचा नाईलाजाने नाशिक विमानतळ किंवा समृद्धी महामार्गाने वेळखाऊ प्रवास होतो. नुकतेच एथर एनर्जीचे सहसंस्थापक तरुण मेहता यांनी 'एक्स'वरील पोस्टद्वारे संभाजीनगरहून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याचे भाष्य केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

उद्योजक राम भोगले यांच्या मते, विमान कंपन्यांनी येथे पसंती देणे गरजेचे आहे. 'उड़ान' योजनेत पात्र नसणे वाढता खर्च तसेच विमाने आणि वैमानिकांची कमतरता या चार प्रमुख कारणांमुळे विमान कंपन्या संभाजीनगरकडे पाठ फिरवत असून अनेक उड्डाणे बंद झाली आहेत. दुसरीकडे, मोठी धावपट्टी आणि पायाभूत सुविधांसह विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सज्ज असल्याचे विमानतळ संचालक शरद येवले यांनी सांगितले. केवळ 'इमिग्रेशन पोस्ट' नसल्याने हे काम रखडले असून, लवकरच यावर सकारात्मक निर्णय होऊन ही अडचण दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लहान विमानांना वाव

इंडिगो, एअर इंडियाने नवीन एअरक्राफ्टच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. त्यानुसार २०२८-२२ पर्यंत ही विमाने प्राप्त झाल्यानंतर संभाजीनगरला नवीन फ्लाईट्स मिळण्याची अपेक्षा आहे. मोठी विमाने सुरु करण्याऐवजी कंपन्यांनी लहान आकाराची विमाने द्यावीत. त्यामुळे कमी प्रवाशी असले तरी उड्डाण शक्य होईल. कंपनीलादेखील हे परवडेल आणि प्रवाशांनाही सुविधा मिळेल. या नवीन खेपेमधे जर लहान एअरक्राफ्ट असतील तर अधिक फायदेशीर ठरेल, असे भोगले यांचे म्हणणे आहे.

आपल्याकडे इमिग्रेशन चेकपोस्ट डिक्लेरेशन नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेता येत नाही. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गृह मंत्रालयाकडून हे लवकर झाल्यास ही सेवा सुरू होऊ शकेल. आमचा पाठपुरावा सुरू आहे. विशेष केस म्हणून २०२३-२४ येथून सलग ११ आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स गेल्या होत्या. दोन तीन महिन्यांत यावर सकारात्मक पाऊल अपेक्षित आहे.

- शरद येवले, संचालक, चिकलठाणा विमानतळ

संभाजीनगर विमानतळावरून कनेक्टिव्हीटीची मागणी आमदार खासदारांसह अनेक उद्योगपतींनी केंद्राकडे अनेकदा केली आहे. मात्र, रूट मिळत नाही किंवा विमान प्रवासी मिळत नाही असा चुकीचा गैरसमज पसरला आहे. येथील वाढत्या उद्योगांच्या सुविधेसाठी कनेक्टिव्हीटी वाढवावी लागेल. जेणेकरून देशातील नाही तर परदेशातील लोक या शहराला कनेक्ट होतील. केंद्र सरकार याकडे गांभीर्याने पहावे, या शहरावर, मराठवाड्यावर अन्याय करू नये,

- संजय शिरसाट, पालकमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT