bribery case 
छत्रपती संभाजीनगर

मुख्य लेखाधिकारी साधना बांगर आणि मंडळ अधिकाऱ्याचा मदतनीस गजाआड

महानगर प्राधिकरणात २० हजारांची, तर सिल्लोडमध्ये जमिनीच्या फेरासाठी १० हजारांची लाच घेताना पकडले

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर / सिल्लोड : शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जालना आणि छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सलग दोन दिवस धडक कारवाई केली आहे. पहिल्या कारवाईत, 'महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'च्या (एमपीएमआरडीए) मुख्य लेखा व वित्त अधिकारी साधना सदाशिवराव बांगर (४४, रा. मिलेनियम पार्क) आणि त्यांचा कंत्राटी लिपिक पठाण मुजीबखान यासिनखान (४८, रा. कन्नड) यांना २० हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी (दि. ६) रंगेहाथ पकडण्यात आले.

तर दुसऱ्या घटनेत, सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे जमिनीचा फेर मंजूर करण्यासाठी १० हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकाऱ्याचा खासगी मदतनीस अमोल श्रीरंग बडक (२८) आणि त्याचा मित्र सचिन काशिनाथ बडक (२९) यांना मंगळवारी (दि. ७) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या दोन्ही कारवायांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य लेखा अधिकारी साधना बांगर यांना दरमहा सुमारे दीड लाख रुपये पगार असतानाही त्यांनी लाचेची मागणी केली. तक्रारदाराने प्राधिकरणाला क्षेत्रीय कामकाजासाठी भाडेतत्त्वावर वाहने पुरवली होती. डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या काळातील १३ लाख ३४ हजार ८५१ रुपयांच्या बिलापैकी ३ लाख २४ हजार ८४० रुपयांचे बिल मिळणे बाकी होते. हे बिल काढण्यासाठी साधना बांगर यांनी २ जुलै रोजी एकूण बिलाच्या ७ टक्के रकमेची मागणी केली होती.

तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी केलेल्या पडताळणीत बांगर यांनी तडजोडीअंती ५ टक्क्यांप्रमाणे लाच घेण्याचे मान्य केले आणि पहिल्या टप्प्यात २० हजार रुपये कंत्राटी लिपिक पठाण मुजीबखान याच्याकडे देण्यास सांगितले. पठाण याने पंचांसमक्ष ही रक्कम प्राधिकरणाचा चालक अशोक याच्याकडे देण्यास सांगितले असता, एसीबीच्या पथकाने बांगर आणि पठाण या दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांच्या घरांची झडती सुरू आहे.

दुसरी कारवाई सिल्लोड तालुक्यात मंगळवारी (दि. ७) करण्यात आली. तक्रारदाराने चिंचपूर येथील गट क्र. १२३ मध्ये खरेदी केलेल्या दोन गुंठे जमिनीचा फेर तलाठी सज्जा पालोद येथील मंडळ अधिकाऱ्यांकडे प्रलंबित होता. तक्रारदाराने मंडळ अधिकाऱ्याचा खासगी मदतनीस अमोल बडक याच्याकडे विचारणा केली असता, "तुमचा फेर नामंजूर झाला असून, तो मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना २० हजार रुपये द्यावे लागतील," असे सांगत लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने सोमवार (दि. ६) रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली. मंगळवारी पंचांसमक्ष झालेल्या पडताळणीत अमोल बडक याने तडजोडीअंती १० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. ही लाचेची रक्कम त्याने त्याचा मित्र सचिन बडक याच्या 'फोनपे' खात्यावर स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही तात्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही धडक कारवाया पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे आणि उपअधीक्षक बी. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कोमल शिंदे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. शासकीय कार्यालयांत कोणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महिला पीआय लपल्या वॉशरूममध्ये

सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक कोमल शिंदे कारवाईसाठी प्राधिकरणाच्या कार्यालयात गेल्या असता, त्या एकमेव अनोळखी महिला असल्याने संशय येण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखत थेट कार्यालयातील वॉशरूम गाठले आणि तिथेच लपून राहिल्या. तक्रारदाराने लाचेची रक्कम देताच ठरल्याप्रमाणे 'शर्टाची बाही' वर करून इशारा दिला. क्षणाचाही विलंब न लावता वॉशरूममधून बाहेर आलेल्या पीआय शिंदे आणि नागरिकांमध्ये मिसळलेल्या एसीबी पथकाने आरोपींना रंगेहाथ पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT