छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांच्या आरोग्याचा खेळ मांडून अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या शहर व परिसरातील तब्बल ८ प्रमुख अन्न व्यवसायांचे (बेकरी, हॉटेल्स आणि इंडस्ट्रियल कॅन्टिन्स) परवाने/नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आले आहे. यात बीड बायपासरोडवरील हॉटेल कार्निव्हल बार अँड रेस्टॉरंट आणि हॉटेल निशांत पार्क रेस्टॉरंटचाही समावेश असून, एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली.
खाद्य व अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कडून सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत बीड बायपासरोडवरील हॉटेल कार्निव्हल बार अँड रेस्टॉरंट येथे तपासणीत परिसर व उपकरणांची दुरवस्था, कच्चे व तयार अन्न एकत्र साठवणे आणि कीड-कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आला. याच भागातील मे. हॉटेल निशांत पार्क रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात प्रत्यक्ष कीटक व उंदीर आढळले. गंजलेली उपकरणे आणि पूर्वसुधारणा नोटिसीचे उल्लंघन केल्याने परवाना रद्द करण्यात आला.
एमआयडीसी वाळूज येथील मिताली रोजयोग येथे उपकरणांचे निर्जंतुकीकरण न करणे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नसणे आणि एप्रन-हातमोजे न वापरणे. मे. एफएस सर्व्हिसेस प्रा. लि. (एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी कॅन्टीन, वाळूज) मध्ये गर्दीचे व अस्वच्छ किचन, भिंतींचे पापुद्रे व कोळ्यांची जाळी, तसेच अन्न साठवणुकीत तापमान नियंत्रणाचा अभाव आढळल्याने परवाना निलंबित करण्यात आला.
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाची गय केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर आणि धडक कारवाई सुरूच राहील, असे अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी सांगितले.
या हॉटेल्सवरही कारवाई
यासह शेंद्रा एमआयडीसी येथील राधाकृष्ण गृह उद्योग, बालापूर येथील टेबल ९ गार्डन रेस्टॉरंट येथे आणि मे. विद्या एन्टरप्राईजेस (एफडीसी कंपनी लि. कॅन्टिन, वाळूज) तसेच मे. ग्रीन प्युअर व्हेज (वाळूज) मध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळून आल्याने या सर्वांचे अन्न उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे कडक निर्देश देण्यात आले.