जायकवाडी धरणात उभारलेल्या जॅकवेलसह पंपाची पाहणी करताना महापालिका आयुक्त अमोल येडगे सोबत एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कार्यकारी अभियंता दीपेंद्र कोराटे, जीव्हीपीआरचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गोगुलोथू. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar water supply scheme : नव्या जलवाहिनीतून 25 दिवसांत पाणीपुरवठा

आयुक्तांकडून योजनेच्या कामाची पाहणी, लिकेज प्रूफसाठी दिल्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी येत्या मे महिन्यात दिले जाईल. त्यासाठी पुढील २५ दिवसांचे टार्गेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला दिले आहे. या कालावधीत जायकवाडी धरणातील जॅकवेलमधून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणि पुढे एमबीआरमध्ये दाखल झाले पाहिजे, अशी सूचना केली आहे. त्यासोबतच गळतीरोधक पद्धत (लिकेज प्रूफ मेथड) सांगण्यात आली आहे, अशी माहिती मंगळवारी (दि.७) योजनेच्या कामाची पाहणी केल्यानंतर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

यावेळी एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कार्यकारी अभियंता दीपेंद्र कोराटे, तुषार टेकवडे, मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसंत भोये, यांत्रिकचे उपअभियंता डी. पी. गायकवाड यांची उपस्थिती होती. महापालिकेचा पदभार घेतल्यानंतर मागील चार दिवसांपासून नवे आयुक्त अमोल येडगे यांनी संपूर्ण विभागाचा आढावा घेतला आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांशी प्रकल्पापैकी एक असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचाही समावेश आहे.

सोमवारी पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतल्यानंतर मंगळवारी आयुक्त येडगे यांनी प्रत्यक्षात स्थळपाहणी करून कामाची सध्यस्थितीची माहिती जाणून घेतली. याबाबत माहिती देताना आयुक्त येडगे म्हणाले की, जायकवाडी धरणातील जॅकवेलपासून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या कामाची पाहणी केली. काम योग्यरीत्या झाले आहे. काही ठिकाणी काही त्रुट्या राहिल्या आहेत. त्या तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.

संपूर्ण शहराचे लक्ष या योजनेतून मिळणाऱ्या पाण्याकडे लागले आहे. त्यामुळे योजनेचे काम तातडीने पूर्ण करुन शहरवासीयांना वाढीव पाणी देणे हे एकमेव टार्गेट सध्या आहे. त्यासाठी एमजेपी, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला पुढील २५ दिवसांचे टार्गेट निश्चित करून देण्यात आले आहे. या कालावधीत पाणी जॅकवेलमधून मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून नक्षत्रवाडीतील नव्या जलशुद्धीकरण केंद्रात आणणे, हे होत असताना जलवाहिनीसोबतच व्हॉल्व्हला कुठेही गळती राहू नये.

सर्व कामे एकसोबतच सुरू करा, त्यासाठी मनुष्यबळ वाढवावा. पूर्ण क्षमतेने पंपिंग करून गळती शोधणे, त्या गळतीचे तातडीने दुरुस्ती करून पाणी पुढे आणणे, गळतीरोधक पद्धतीचा अवलंब करणे, त्यासाठी काही पद्धती कंत्राटदार व एमजेपीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचेही आयुक्त म्हणाले. तसेच या कालावधीत मोठे लिकेज कुठेही निघाले नाही तर २५ दिवसांत शहरात पाणी पोहचेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

ढोरकीन जलवाहिनी फुटली

नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून सध्या पाण्याची चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीदरम्यान अगोदर कवडगावजवळ वेल्डिग निखळल्याचे आढळले. त्यानंतर आता ढोरकीनजवळ जलवाहिनीला गळती आढळली आहे. हे लिकेज शोधण्यासाठीच चाचणी सुरू असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लिक डिटेक्शन मशीन घ्या

नव्या संपूर्ण जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना तीन प्रकारचे लिक डिटेक्शन मेडथ सांगण्यात आली आहे. त्यासोबतच लिक डिटेक्शन मशीन घेण्याचीही सूचना केली आहे. त्यामुळे गळती शोधण्याची गती वाढेल, असेही आयुक्त अमोल येडगे म्हणाले.

पूर्ण करायची कामे...

  • ढोरकीनजवळ लागलेली गळती तातडीने दुरुस्त करणे

  • त्यानंतर पुर त्यानंतर पुढील ७ दिवसांत पाणी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात आणणे

  • जलवाहिनी स्वच्छ करण्यासोबतच व्हॉल्व्हची किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्ण करणे

  • जलशुद्धीकरण केंद्राजवळील आवश्यक परवानगी घेणे, बेड तयार करणे

  • जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करणे

  • एमबीआरपासून जलकुंभांना पाणीपुरवठा करताना काही ठिकाणी गॅप जोडण्या पूर्ण करणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT