water crisis  file photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar water crisis| जिल्ह्यातील १४२ गाव, वाड्यांना १७० टँकरद्वारे पाणी

Water tankers deployed in Chhatrapati Sambhajinagar villages - टंचाईची तीव्रता : पैठण, गंगापूरला सर्वाधिक झळा, अडीच लाख नागरिकांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरअखेर आणि दिवाळीच्या तोंडावरच जिल्ह्यातील ११३ गावे आणि २९ वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्रतेने गंभीर रूप धारण केले आहे. येथील अडीच लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १७० टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रशासनाने विहिरींचे अधिग्रहण केले आहेत. यात सर्वाधिक झळा गंगापूर, पैठण तालुक्यांना सहन कराव्या लागत आहे.

मान्सूनमध्ये पावसाचा खंडकाळ अधिक राहिल्याने यंदा जिल्ह्यात पावसाळा संपताच पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांपैकी पैठण आणि गंगापूर तालुक्यांना पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. पैठण तालुक्यातील ३३ गावे आणि १५ वाड्यांसाठी ५३ टँकर सुरू असून, त्यासाठी दररोज ९३ खेपा मंजूर आहेत.

गंगापूर तालुक्यातील ३७ गावांना ५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या तालुक्यात ११६ खेपा मंजूर असून, सर्व खेपा पूर्ण होत आहेत. तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १४ गावे आणि ११ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी २१ टँकर सुरू केले आहेत. येथे मंजूर ३९ खेपांपैकी ३८ खेपा पूर्ण होत आहेत. फुलंब्रीतील ११ गावांना १२ टँकरने, तर वैजापूरमधील १८ गावांसह ३ वाड्यांना २६ 000 टँकरद्वारे पाणी वितरित करण्यात येत आहे. या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आता पाणी टंचाईला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी अद्याप सिल्लोड आणि सोयगाव, खुलताबादमधून टँकरची मागणी आलेली नाही.

६९ विहिरींचे अधिग्रहण

टँकरवरील वाढता भार कमी करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी जलस्रोतांचा आधार घेतला आहे. जिल्ह्यातील ६५ गावांसाठी ६९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी ५६ विहिरी टँकर भरण्यासाठी, तर १३ विहिरी वैयक्तिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांमुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दररोज ४ खेपांना दांडी

जिल्ह्यात दररोज ३२४ टँकर खेपांना मंजुरी देण्यात आली असताना प्रत्यक्षात ३२० खेपाच पूर्ण होत आहेत. म्हणजेच दररोज चार खेपा कमी होत आहेत. एक टँकर कमी झाल्याने शेकडो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे टँकरची प्रत्येक फेरी तेवढीच महत्त्वाची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT