मृत गोपाल रामदास साबळे व गौरव रामदास साबळे 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati sambhaji nagar | शेततळ्याने हिरावले दोन निष्पाप जीव, शिवना परिसरात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी बुडून मृत्यू

उन्हाळी सुट्टीत घरी आलेल्या चिमुकल्यांवर काळाचा घाला, दोघेही होते शाळेसाठी बाहेरगावी

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला. खेळता-खेळता शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवना गावावर शोककळा पसरली असून साबळे कुटुंबाच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे गौरव रामदास साबळे (वय१२ वर्ष) व गोपाल रामदास साबळे (वय१० वर्ष) अशी आहेत. दोघेही मेंढपाळ कुटुंबातील असून शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होते. उन्हाळी सुट्टी लागल्याने ते आनंदाने घरी आले होते; मात्र नियतीने त्यांच्यावर क्रूर घाला घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळ रामदास साबळे हे मुलांसह मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. शिवना येथे बाजार असल्याने त्यांनी मोठ्या मुलाला सांगून बाजारासाठी गेले . दरम्यान, दोन्ही भाऊ खेळता-खेळता शेततळ्याजवळ गेले. काठावरून पाय घसरल्याने दोघेही पाण्यात पडले. शेततळ्याला प्लास्टिक अस्तरीकरण केलेले असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बाजार आटोपून रामदास साबळे परत आल्यानंतर मुलं दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. ग्रामस्थांनीही मदतकार्य हाती घेतले. अखेर शेततळ्यात दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला. अत्यंत शोकाकुल वातावरणात शिवना येथे दोन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिक्षणासाठी बाहेरगावी, पण नियतीने घातला घाला.

रामदास साबळे यांचे कुटुंब किन्हे फाटा येथे वास्तव्यास आहे. पारंपरिक मेंढपाळ व्यवसायातून संसार उभारत असताना मुलांनी शिकून मोठे व्हावे, या आशेने त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवले होते. गौरव रामदास साबळे हा न्यू ओएसिस इंग्रजी शाळा, फुलंब्री येथे शिक्षण घेत होता, तर गोपाल रामदास साबळे हा स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळा, सिल्लोड येथे शिकत होता. उन्हाळी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी घरी आलेल्या या दोन्ही भावांचे आयुष्य एका क्षणात संपुष्टात आले.

रामदास साबळे यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दोन चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांचा आक्रोश पाहून गावकऱ्यांचेही हृदय हेलावले.

शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाच्या नियमानुसार शेततळ्यांना संरक्षणात्मक कुंपण करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमध्ये व पावसाळ्यात लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT