नितीन थोरात
वैजापूर : तालुक्यात वाळू तस्करीवरून दोन गटांमध्ये मध्यरात्री जोरदार राडा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाळू तस्करांमधील अंतर्गत वाद थेट हिंसाचारात परिवर्तित झाला असून, दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करत वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील अव्वलगाव परिसरात गोदा नदी पात्रातून खुलेआम अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. पोकलेन व मोठमोठ्या हायवा वाहनांच्या माध्यमातून ही वाहतूक सुरू असून, या तस्करीवरून तस्करांमध्ये वारंवार वाद होत आहेत. अशाच वादातून शनिवारी मध्यरात्री नागमठाण शिवारात ही गंभीर घटना घडली.
किरकोळ वादातून सुरुवात झालेला संघर्ष काही क्षणातच हाणामारीत बदलला. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करत वाहनांची थेट तोडफोड केली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अवलगाव, डाकपिंपळगाव, बाबुळगाव गंगा, पुरणगाव या भागांत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे यापूर्वीही एका नागरिकाचा हायवा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला होता. तसेच हायवांच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी काही वेळा हायवा पेटवून दिल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
इतकेच नव्हे तर वाळू तस्करांकडून हत्यारांचा वापर करून गावांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले होते. मात्र, या गंभीर प्रकरणांबाबत पोलिसांची भूमिका ‘हातावर घडी, तोंडावर बोट’ अशीच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, तस्करांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत वीरगाव पोलीस ठाण्याच्या प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.