कन्नड : दि. ३ सप्टेंबर रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौताळा अभयारण्य, सायगव्हाण शिवारातील गट नं. ७५ सनसेट पॉईंट जवळील घनदाट जंगलात एक बेवारस मृतदेह आढळला होता. अंदाजे २५ ते ३० वयोगटातील हा युवक होता. याचा गळा कापून, डोकं धडापासून वेगळं करून, पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्न केला होता. निखिल हिरामण सूर्यवंशी हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
यावरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक सौ. अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान मृताच्या अंगावरील अंडरवेअर, हातातील घड्याळ आणि जबड्यात बसवलेली क्लिप मिळून आली. सदर क्लिप एसएमबीटी हॉस्पिटल, नांदीहिल्स, धामणगाव घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे बसवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हॉस्पिटलच्या नोंदीनुसार दिनांक २२/०७/२०२३ ते ०७/०८/२०२३ दरम्यान निखिल हिरामण सूर्यवंशी (वय २८ वर्ष, रा. सिंदी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या युवकास ही क्लिप बसवण्यात आली होती.
तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक ०४/०९/२०२५ रोजी मिसिंग क्र. ५३/२०२५ अन्वये त्याबाबत हरवल्याची नोंद असल्याचे आढळले. यावरुन मृतदेहाची ओळख पटली होती. स्थानीय गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी सिंदी गावात मुक्काम करून सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मयताचे मित्र, नातेवाईक, गावकरी, व कामाच्या ठिकाणची माहिती घेतली.मयत निखिल हा रोजंदारीवर धुमस चालवण्याचे काम करीत होता. तसेच तो बकऱ्या चोरणे, गुंडगिरी करणे यामध्ये गुंतलेला होता. या साऱ्या गोष्टी त्याचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर (रा. सिंदी, ता. चाळीसगाव) यास माहित होत्या. पथकाने श्रावण याच्यावर लक्ष ठेवले. त्यास भावनिकदृष्ट्या विश्वासात घेत विचारपूस केली असता त्याने संपूर्ण हकीकत सांगितली.
हत्येची कबुली
श्रावणने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६/०८/२०२५ रोजी निखिलने त्यास छत्रपती संभाजीनगर येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. त्यांनी मोटरसायकलने सायगव्हाण मार्गे गौतळा सनसेट पॉईंट जवळ पोहोचले. तेथे निखिलने श्रावणला सांगितले की, "तू माझ्या गोष्टी गावात सांगतोस, त्यामुळे माझी बदनामी होते आहे. तू मेला तर माझे सर्व अडथळे दूर होतील, माझे लग्न होईल." हे बोलून निखिलने कु-हाड काढून श्रावणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. झटापटीत श्रावणने निखिलच्या गुप्तांगावर लाथ मारली, त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर श्रावणने कु-हाड हिसकावून निखिलच्या मानेवर वार करून त्याचे डोके धडापासून वेगळे केले, असे त्याने कबूल केले. गुन्हा कबूल केल्याने आरोपीस पुढील तपासासाठी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सौ. अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि संतोष मिसळे, सपोनि पवन इंगळे, पोह. प्रमोद पाटील, वाल्मिक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, प्रशांत नांदवे, महेश बिरुटे, समाधान दुबीले, दीपक सुरोसे, बलवीरसिंग बहूरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, निलेश कुडे व मपोशि कविता पवार यांनी केली आहे.