खुलताबाद :- तालुक्यातील गल्लेबोरगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) अपराजिता अग्निहोत्री यांनी सोमवारी सायंकाळी धडक कारवाई करत मोठी कारवाई केली. खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व त्यांच्या पथकासह करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण १३ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून ११ मोटारसायकली, १३ मोबाईल फोन, सुमारे ७० हजार रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई राबविण्यात आली. गल्लेबोरगाव परिसरात आशोक दांडगे हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या शेतामध्ये खुलेआम जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर डीवायएसपी अपराजिता अग्निहोत्री, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आशोक दांडगे यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडकला आणि छापा टाकण्यात आला.
पोलिसांचा छापा पडताच जुगार खेळत असलेल्या जुगाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, नियोजनबद्ध व चोख पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईत घटनास्थळावरून १३ जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. तपासणीदरम्यान जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम, १३ मोबाईल फोन तसेच जुगाऱ्यांच्या मालकीच्या ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अंकुश सरोदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईत पोलीस उपअधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे कन्नड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार रामचंद्र पवार, हेडकॉन्स्टेबल कैलास निंबोरकर, अमलदार मयुर वाळुंजकर, महिला पोलीस अमलदार शितल बारगळ, हेडकॉन्स्टेबल शेख जाकिर, आनंद आरसुडे, उत्तम खटके, राजेंद्र मुळे, सोनाली कुंदे, संदीप कनकुटे, अजय मोतींगे, बाबासाहेब वाघ आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
या कारवाईमुळे गल्लेबोरगाव व परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अशा धडक कारवाई पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध जुगार, दारू विक्री किंवा इतर बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले आहे.