पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण – शेवगाव रोडवरील खुले कारागृहाच्या परिसरात एसटी बसने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात पैठण खुले कारागृहाचे लिपिक यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२४) सकाळी नऊच्या सुमारास घडली. अपघातानंतर पेट घेतल्याने मोटर सायकल जळून खाक झाली. अनिल दत्तात्रय पाटील (वय ४५, रा. टाकळी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे मृत लिपिकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण – शेवगाव रोडवरील जिल्हा खुले कारागृहामध्ये कार्यरत लिपिक अनिल पाटील नेहमीप्रमाणे आज सकाळी नऊच्या सुमारास आपल्या मोटर सायकलवरून कारागृहातील कार्यालयात येत होते. यावेळी पैठणहून साताराच्या दिशेने निघालेल्या एसटी बसने (MH20BL- 2164) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मोटरसायकलने अचानक पेट घेतला. यात मोटरसायकल जळून खाक झाली.
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा खुले कारागृहाच्या अधीक्षक धनसिंग कवाळे, तुरुंग अधिकारी नागिनाथ भानवसे, सुभेदार संजय कदम, सुरेश ठेपणे, हरेश पिंपळ, बालाजी जाधव, सलमान शेख, बाळू कर्डिले यांनी अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने अनिल यांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाटील यांना तपासून मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकाने पंचनामा केला.
हेही वाचा