छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhaji Nagar : विद्यापीठात होणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र स्थापन करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. असे असले, तरी या अध्यासन केंद्रासाठी कोणतेही नवीन पद तयार करता येणार नाही. विद्यापीठाच्या आकृतिबंधातूनच या केंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

राज्यातील विविध अकृषी विद्यापीठांमध्ये थोर व्यक्तींच्या नावे अध्यासन केंद्रे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही महात्मा फुले प्रतिष्ठान संशोधन केंद्र, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, महात्मा गांधी अध्यासन केंद्र, गौतम बुद्ध अध्यासन केंद्र, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, वसंतराव नाईक संशोधन केंद्र यांसह सुमारे एक डझन अध्यासन केंद्रे आहेत. काही वर्षांपासून विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्रही सुरू केले होते, परंतु ते विद्यापीठ फंडातून सुरू करण्यात आले होते. आता राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रास प्रशासकीय मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर सर्व मनामनात व्हावा, तसेच महाराजांचे विचार, त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी या उद्देशाने हे अध्यासन केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने म्हटले आहे.

ठोक ३ कोटींचा निधी

सध्या विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र हे कागदावरच आहे. त्याला स्वतंत्र इमारत नाही. मात्र, आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून या अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी ठोक ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे

विद्यापीठ फंडातून छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या प्रा. रगडे त्याचे संचालक आहेत. आता शासनाने मान्यता दिल्याने येत्या काळात त्यासाठी स्वतंत्र इमारत आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील युद्धनीती, अर्थशास्त्र, कृषी, प्रशासन, गडकिल्ल्यांची निर्मिती, त्यांचे संवर्धन, आरमार आदी बाबींचे संशोधन या केंद्रात केले जाईल.
– डॉ. भगवान साखळे, कुलसचिव.

SCROLL FOR NEXT