police written exam
छ. संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई लेखी परिक्षा ७ जुलैला होणार आहे. Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : ग्रामीण पोलिस शिपाई लेखी परीक्षा एमजीएममध्ये होणार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिस दलाच्या शिपाई पदासाठी मैदानी चाचणी पार पडली असून १२६ जागांसाठी ७ जुलैला १ हजार १६७ उमेदवारांची एमजीएम कॅम्पसमधील जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये (जेएनईसी) लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळी १० वाजेपर्यंत उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. ११ वाजता प्रत्यक्ष परीक्षेला सुरूवात होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.

ग्रामीण पोलिस दलाच्या शिपाई पदाच्या १२६ जागांसाठी ४ हजार ३४७ उमेदवारांनी अर्ज केले. १९ ते २८ जूनदरम्यान त्यांची मैदानी चाचणी पार पडली. तेथे केवळ २ हजार ९२५ उमेदवार हजर राहिले. त्यातील ३०३ उमेदवार अपात्र ठरले. २ हजार ६२२ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र झाले होते. १२६ जागांसाठी १ हजार १६७ उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करून घ्यावे. त्यानंतर एन-६, सिडकोतील एमजीएम कॅम्पसमधील जेएनईसी कॉलेजमध्ये ७ जुलैला सकाळी १० वाजेपर्यंत परीक्षेसाठी हजर राहावे, असे आवाहन कलवानिया यांनी केले आहे.

शहर पोलिस : बॅन्डस्मन पदासाठी कौशल्य चाचणी

शहर पोलिस दलात पोलिस शिपाई बॅन्डसमन पदासाठी ६३१ उमेदवारांनी मैदानी चाचणीत ५० टक्के (२५ गुण) पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यांची ८ ते १० जुलैदरम्यान देवगिरी कवायत मैदान, पोलिस आयुक्तालय येथे सकाळी ९ वाजेपासून कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १:१० याप्रमाणे लेखी परीक्षा घेतली जाईल. दरम्यान, पोलिस शिपाई पदाच्या २१२ जागांसाठी २ हजार २२८ उमेदवारांची लेखी परीक्षा ७ जुलैला गुरुमाऊली वेअर हाऊस, करोडी टोलनाका येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली.

उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पेन व परीक्षा पॅड पुरविले जातील. तसेच, उमेदवारांनी सोबत कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाइल, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच, ब्ल्यू टूथ हेडफोन असे काहीही आणू नये. ते उमेदवारांकडे आढळल्यास त्यांना बाद केले जाईल. शिवाय, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये. भरतीसाठी कोणाशीही पैशांचा व्यवहार करू नये. कोणी पैसे मागितल्यास थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
- मनील कलवानिया, पोलिस अधीक्षक
SCROLL FOR NEXT