Celebrations for 'Praveshotsav' (School Admission Festival) in Municipal Corporation Schools on June 15
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी महापालिका शिक्षण विभागाने व्यापक तयारी पूर्ण केली असून १५ जून रोजी शहरातील ५० मनपा शाळांमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रत्येक शाळेत वर्ग-१ आणि वर्ग-२ दर्जाचे अधिकारी पालक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते नव विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि गणवेश वाटप करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि.१२) मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुख्याध्यापकांची विशेष बैठक पार पडली.
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शाळांबाबत पालकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव मिळावा, या उद्देशाने प्रवेशोत्सवाचे नियोजन शुक्रवारी आयुक्त अमोल येडगे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत करण्यात आले.
यासाठी ५० अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते संबंधित शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. तसेच शाळांमधील विविध उपक्रमांचा आढावाही घेणार आहेत. या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शिक्षणातील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि पटसंख्या वाढीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आयुक्त अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सुरक्षित आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी आणि सर्व मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
शाळा परिसरातील सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांची शिस्त, उपस्थिती आणि संरक्षण याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी मुख्याध्यापकांना