Case registered against person who gave false information about bomb blast in mosque
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहर पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी (दि.६) दुपारी बाराच्या सुमारास एकाने फोन करून औरंगाबाद के मशिदो में कुछ लोग बॉम्ब ब्लास्ट करणे वाले हैं, अशी माहिती दिली. यामुळे पोलिस यंत्रणा हादरून गेली. पोलिसांनी तात्कळ फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केल्यानंतर तो शेख सलीम शेख चांद पाशा (३५, रा. मनियार गल्ली, रविवार पेठ, अंबाजोगाई, जि. बीड) असल्याचे निष्पन्न होऊन तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र त्याच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
अधिक माहिती नुसार, पोलिस उपनिरीक्षक अश्फाक मुश्ताक शेख हे गुरुवारी (दि.६) पोलिस नियंत्रण कक्षात कर्तव्यावर होते. दुपारी बाराच्या सुमारास एकाने नियंत्रण कक्षाच्या लँडलाईनवर कॉल केला. मै मनियार गल्ली, अंबाजोगाई से शेख सलीम बोल रहा हु, औरंगाबाद के मशिदो में कुछ लोग बॉम्ब ब्लास्ट करणे वाले हैं, असे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तात्काळ बीड पोलिसांशी संपर्क साधून फोन करणाऱ्याची माहिती घेण्यास कळविले.
अंबाजोगाई ठाण्याचे निरीक्षक जोगदंड यांच्याशी सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी संपर्क साधून त्याना आरोपीचे लोकेशन कळविले. त्यानंतर जोगदंड यांनी त्या आरोपीचा शोध घेऊन माहिती घेतली असता तो खोटे बोलत असल्याचे समोर आले.
त्याने अफवा पसरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले होते. तो मनोरुग्ण असून, त्याच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहेत. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी रविवारी (दि.९) दिली.