कार कालव्यात कोसळली; तिघे बेपत्ता file photo
छत्रपती संभाजीनगर

Car Accident : कार कालव्यात कोसळली; तिघे बेपत्ता

पैठण तालुक्यातील चांगतपुरी शिवारात घडलेली दुर्घटना; चालक चमत्कारिकरित्या बचावला

पुढारी वृत्तसेवा

Car falls into canal; three missing

पैठण, पुढारी वृत्तसेवा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथून पिंपळवाडी (पि) येत असलेली स्विफ्ट कार अचानक पैठण तालुक्यातील चांगतपुरी शिवारातील जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कोसळली. कालव्याला प्रचंड पाणी असल्याने अपघातानंतर कारमधील दोघेजण बुडाले. आणि त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेला एक तरुण असे तिघे वाहून गेले. या तिघांचाही रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. या अपघातातून कारचालक मात्र चमत्कारिकरीत्या बचावला. ही दुर्घटना सोमवारी (दि.२३) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.

घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील हदगाव तांबी येथील रहिवासी असलेले अल्ताफ पठाण हे साला मुखीद अहेमद शेख त्यांची बायको निलोफर मुशिद शेख (रा. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) आणि मेव्हण्याला घेऊन रात्री (एमएच-१२ केजे ९०३२) या क्रमांकाच्या स्विफ्ट कारने छत्रपती संभाजीनगरकडे येण्यासाठी निघाले. पठाण कार चालवत होते. चांगतपुरी शिवारात त्यांची कार पोहोचली. दरम्यान, पैठणच्या उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आलेले आहे.

गुगल मॅपने केला घात

चालकाने दिलेल्या माहितीनुसार गावाकडून निघाल्यानंतर गुगल मॅप लावला होता. या मॅपच्या आधाराने हदगावकडून तो संभाजीनगरकडे येत होता. चांगतपुरी कालव्याजवळ येताच गुगल मॅपने उजवीकडे वळण दाखविले चालकाने उजवीकडे स्टेरिंग वळवताच कार थेट कालव्यात पडली. असे सांगण्यात आले.

या कालव्यावर कार येताच अचानक अल्ताफ पठाण यांचे नियंत्रण सुटले आणि कार थेट कालव्याच्या पाण्यात कोसळली. आवाज ऐकून जवळच असलेला चांगतपुरीचा एक तरुण मदतीसाठी धावत आला. या तरुणाने तात्काळ पाण्याच्या कालव्यात उडी मारली. ही झालेली आरडाओरड ऐकून गावातील नागरिक धावत आले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले.

मात्र तोपर्यंत कारचालक पठाण त्याचा साला आणि त्याची बायको आणि त्यांच्या बचावासाठी पाण्यात उतरलेल्या चांगतपुरीचा तरुण रावसाहेब खेडकर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्याचवेळी पठाण मात्र चमत्कारिकरीत्या बचावला. त्याला नागरिकांनी आणि पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद यादव सुखरूप बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले.

रात्री उशिरापर्यंत शोधकार्य

घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नंतर क्रेनच्या सहाय्याने कार कालव्यातून बाहेर काढण्यात आली. मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तिघांचाही रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT