पेटलेली धावती बस प्रवासी उतरल्यानंतर काही क्षणातच अशी जळून खाक झाली. प्राचार्य नागवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधाने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar bus fire : तब्बल अर्धा किलोमीटर पाठलाग करून वाचवले प्रवाशांचे प्राण

बसने पेट घेतला, कार चालकाच्या प्रसंगावधानाने ३८ प्रवाशांचे वाचले प्राण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पांढरी पिंपळगावजवळ शुक्रवारी (दि.१७) सकाळी साडेआठच्या सुमारास धावत्या बसने पेट घेतला. ही बाब बसच्या मागे असलेल्या कारचालकाच्या लक्षात आली. त्यांनी बस चालकाला हॉर्न, हातवारे, आवाज देऊन सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु बसचालकासह प्रवशांनाही त्याचा अंदाज आला नाही. दरम्यान, विपरित घडण्याआधीच तब्बल अर्धा किलोमीटर बसचा पाठलाग करून बससमोर कार आडवी लावली अन् बस पेटल्याची सांगितले. चालकांसह सर्व प्रवासी खाली उतरले अन् काही क्षणात बस जळून खाक झाली.

धुळे-सोलापूर महामार्गावर संभाजीनगरहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या धावत्या बसने (एमएच ०९ एफएल ८१३४) अचानक पेट घेतला. ही बाब बसच्या मागे असलेल्या कार मधील प्राचार्य अमोल नागवडे दिलीप विघ्ने, गणेश शितोळे आणि वैभव पवार यांच्या नजरेस पडली. त्यांनी हातवारे करत, आवाज दिला, सलग हॉर्नही वाजवला, परंतु बसमध्ये सुरू असलेला हरिनाम गरज आणि भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ यामुळे मृत्यू सोबत धावत असल्याची कल्पना बसमधील एकालाही नव्हती.

प्राचार्य अमोल नागवडे यांनी कारने तब्बल अर्धा किलोमीटर बसचा पाठलाग करत पांढरी पिंपळगावजवळ बसच्या समोर कार आडवी लावली. तोपर्यंत आगीने बसच्या खालच्या बाजुने पेट घेतलेला होता. नागवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बस पेटल्याचे सांगून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले अन् काही क्षणातच बस जळून खाक झाली.

... तर कोळसा झाला असता

आग बसच्या खालच्या बाजूने लागल्याने याची कल्पना प्रवासी आणि चालकालाही नव्हती. कार चालक काही मिनिटे उशिराने पोहोचले असते तर कदाचित प्रवाशांचा कोळसा झाला असता, अशी शक्यता प्रथमदर्शीने व्यक्त केली.

दागिन्यांसह पैसे जळाले

आग इतकी भयंकर होती की या आगीत प्रवाशांच्या बॅगमध्ये असलेले दागिने काहींचे पैसे असे सुमारे तीन लाखांच्या आसपासचा ऐवज जळून खाक झाला. बसमध्ये ३८ प्रवासी होते ते सर्व सुखरूप आहेत. यातील अनेक भक्तांनी कारचालकाच्या रूपात पांडुरंग अवतरला आणि आम्हाला वाचवले, अशा भावना व्यक्त केल्या.

शॉर्टसर्किटची शक्यता

ही बस इंचलकरंजी आगाराची होती सकाळी संभाजीनगरहून इचलकरंजीकडे जात असताना तिला आग लागली. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा अंदाज प्राथमिक तपासणीतून समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT