हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर हद्दीत बिबट्याने धुमाकूळ घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास हतनूर शिवारातील शेतकरी विश्वास तातेराव काळे यांच्या शेतातील गट नंबर ४४९ मधील गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढविला. यात वासरू जागीच ठार झाले.
शेतकरी विश्वास काळे यांनी सांगितले की,मी सकाळी जनावरांना चारा पाणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे शेतात पोहचलो. तेव्हा गोठ्यात बांधलेल्या वासराचा आवाज आला नाही. तेव्हा पाहणी केली असता ते वासरू मेलेल्या अवस्थेत दिसले. गोठ्यात बिबट्याने वासराला लांब पर्यंत ओढत नेवून वासराला ठार केल्याचे यावेळी आढळून आले. मात्र पुन्हा आमच्यावरही हल्ला होईल या भितीने सर्व शेतकरी गावात आलो. या बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार झाले असल्याची माहिती पोलीस पाटील प्रकाश पवार यांना दिली.
यावेळी वनविभागाच्या श्रीमती सोनवणे,अशोक आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली.घटनेने हतनूर शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. या भागात त्वरित जाळे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.