Bus stand, railway station crowded, Chakarmani on his way back as soon as Diwali ends
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणाच्या निमित्त गावी, शहरात आलेले परतीच्या मार्गाला लागले आहेत. सोमवारपासून (दि.२७) शासकीय, निमशासकीय कार्यालये नियमित सुरू होत असल्याने रविवारी (दि. २६) बसस्थानकांसह रेल्वेस्थानक प्रवाशाने फुलून गेले होते. बसस्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीमुळे पाय ठेवायलाही जागा नव्हती. तर रेल्वेचे अॅडव्हान्स बुकिंग करूनही अनेकजण वेटिंगवर असल्याने अनेकांनी मिळेल त्या डब्यातून प्रवास केला.
एसटी महामंडळाने विविध मार्गांवर जादा बसची व्यवस्था केली आहे. असे असले तरी दिवाळी संपताच कामाच्या ठिकाणी जाणाऱ्यांची गर्दी अचानक वाढल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांना बसची व्यवस्था करताना दमछाक होत होती. अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग केल्याने ऐनवेळी आलेल्या प्रवाशांना साध्या गाडीत तेही उभ्याने प्रवास करण्याची वेळ आली. तर अनेकांनी ऐन वेळी खासगी गाडीने गाव जवळ करण्याचा निर्णय घेत खासगीने प्रवास केला.
रेल्वेही हाऊसफुल
अनेकांनी दिवाळीचे नियोजन एक महिन्याआधीच केले होते. असे असले तरी काहींना शेवटपर्यंत वेटिंगवरच रहावे लागले. त्यामुळे काहींनी मिळेल त्या डब्यात बसून विविध मार्गांवर प्रवास केला. अॅडव्हान्स बुकिंगसह ऐनवेळी जाणाऱ्याची प्रवाशांची संख्या अचानक वाढल्याने रेल्वेस्थानकांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सचखंड एक्स्प्रेस क्रांती एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी तिरुपती एक सप्रेस, ओखा एक्सप्रेस, देवगिरी, नंदीग्राम एक सप्रेस यांना मोठ्या प्रमाणत वेटिंग आहे.
सुट्यांमुळे गर्दी कायम
महाविद्यालय शाळांना ५ नोंव्हेबरपर्यंत सुट्ट्या असल्याने नातेवाईकांकडे शहरात आलेल्या तर नातेवाईकांकडे इतर ठिकाणी गेलेल्या कुटुंबीयांचा परतीचा प्रवास १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ ही ५ नोव्हेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर राहणार असल्याने सोमवार पासूनही सर्वच मार्गावर एसटीसह रेल्वेला गर्दी राहणार आहे.