छत्रपती संभाजीनगर : गावाहून परतलेल्या पत्नीला आणण्यासाठी मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या एका कृषी विभागातील कर्मचाऱ्याचे घर अवघ्या २० मिनिटांत फोडून चोरट्यांनी दीड तोळ्याचे दागिने, १ हजाराची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.१८) रात्री १:२० वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील गजानननगरात घडली. चोरी करून पळणाऱ्या दोन चोरट्यांपैकी एकाला धाडसाने पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झटका देऊन पसार झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेश सुरेश सदावर्ते (३८, रा. गल्ली क्र. ४, गजानननगर) यांच्या तक्रारीनुसार, ते खुलताबाद येथील कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. त्यामुळे ते आपल्या ११ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांच्या मुलासह घरातील पहिल्या मजल्यावर झोपलेले होते.
मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीने फोन करून 'मी शिवाजीनगर रोडवरील जानकी हॉटेलजवळ आले आहे, मला घेण्यासाठी या, असे सांगितले. त्यामुळे सदावर्ते यांनी तळमजल्याच्या दरवाजाला कुलूप लावले आणि ते दुचाकीवरून पत्नीला आणण्यासाठी गेले. सदावर्ते हे पत्नीला घेऊन अवघ्या २० मिनिटांनी म्हणजेच रात्री १.२० वाजता घरी परतले.
ओरडताच चोरटे घराबाहेर पळाले
गाडी पार्क करत असताना त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. चोरीचा संशय आल्याने ते जोरात ओरडले असता घरातून अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील दोन चोरटे बाहेर पळत आले. त्यापैकी बदामी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या एका तरुणाला सदावर्ते यांनी पकडले, मात्र त्याने जोरात झटका दिला आणि दोन्ही चोरटे पळून गेले.
कपाटाचे कुलूप तोडून दागिन्यांची चोरी
सदावर्ते दाम्पत्याने घरात जाऊन पाहिले असता तळमजल्यावरील किचनमधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडलेले होते. आतील डबीत ठेवलेले एक तोळ्याचे मिनीगठण, ५ ग्रॅमची सोन्याची कानातली रिंग आणि १ हजार रुपयांची रोख असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याचे समोर आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंढे, सहायक निरीक्षक शिवप्रसाद कहऱ्हाळे यांच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉस्टेबल ससाणे करत आहेत.
वाईन शॉपवर क्रेडिट कार्डने खरेदी
सूत्रांच्या माहितीनुसार, घरफोडीमध्ये चार चोरटे होते. दोन आजूबाजूलाच थांबलेले होते. घरातून दागिने, रोख रकमेसह क्रेडिट कार्डही लंपास केले आहे. या कार्डद्वारे चोरट्यांनी दोन वाईन शॉपवर विनापासवर्ड खरेदी करण्यासाठी स्वॅप केले. एकेठिकाणी खरेदीचा प्रयत्न फसला. दरम्यान, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे.