पैठण : पाटबंधारे विभागाच्या शासकीय भूखंडावरील अतिक्रमणवर बुलडोजर फिरविण्याची मोहीम शुक्रवारी (दि. १२) दुपारनंतर सुरू करण्यात आली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांच्या पथकाने ही कारवाई केली. पाटबंधारे विभागाचे ५६ हेक्टर क्षेत्र वर जायकवाडी उत्तर, जायकवाडी दक्षिण नाथसागर धरण परिसरातील जा गेवरील शासकीय निवासस्थानासह सहान जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, अभियंता मंगेश शेलार, तुषार विसपुते, रितेश भोजने, एमआयडीसी सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १५ जेसीबी मशीन सह सात अतिक्रमण हटाव पथकाच्या माध्यमातून प्रथम उत्तर जायकवाडी येथील शासकीय निवासस्थान पाडण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
यावेळी अतिक्रमणधारक नागरिकांनी घरामध्ये सुरू असलेले वीज कनेक्शन बंद केले. घर पाडले जात असताना अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. काही अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केले. अतिक्रमणधारक आपले संसारोपयोग साहित्य सुरक्षित स्थळी नेऊन ठेवण्यासाठी धावपळ करताना दिसून आले.
दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या ५६ हेक्टर क्षेत्रावरील सर्व भूखंडावरील झालेले अतिक्रमण हटविले जाणार आहे. सध्या सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेंतर्गत नागरिकांकडून कुठलाही अडथळा आला नाही.
अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार
अनेक वेळेस नोटीस बजावण्यात आलेली असतानादेखील संबंधित अतिक्रमण काढून न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू केलेली मोहीम कुठल्याही परिस्थितीत थांबणार नसल्याचे संकेत पाटबंधारे शासकीय विभागाने दिले.