Diwali 2026 : बोनस मिळाला, पगार झाला! बाजारपेठेत उत्साह file photo
छत्रपती संभाजीनगर

Diwali 2026 : बोनस मिळाला, पगार झाला! बाजारपेठेत उत्साह

दिवाळी तोंडावर आल्याने खरेदीसाठी गर्दी; उलाढाल वाढल्याने व्यापारी सुखावले

पुढारी वृत्तसेवा

Bonuses received, salaries paid! Excitement in the marketplace

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाच्या सावटातही दसऱ्याला मोठी उलाढाल झाल्यानंतर आता बाजारपेठेला दिवाळीचे वेध लागले आहेत. त्यानुसार शहरातील व्यापा-यांनीही जय्यत तयारी केली आहे. दिवाळीच्या तोंडावर नोकरदार आणि कामगार वर्गाला बोनससह पगारही मिळाल्याने महिन्याच्या पहिल्याच तारखेला, रविवारी (दि. १) बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच नवीन कपडे, गृहउपयोगी साहित्य आणि गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानांमध्ये रेलचेल दिसून आली. त्यामुळे रस्त्यांवरही गर्दी वाढल्याने बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे व्यापारीवर्गही आनंदित झाला आहे.

दीपावली म्हणजे आनंद, उत्साह आणि चैतन्याचा सण. दिवाळीत प्रत्येक जण स्वतःसह कुटुंबीयांसाठी नवीन कपडे आणि गृहउपयोगी वस्तूंची खरेदी करतो. दिवाळीचा सण अवध्या पाच दिवसांवर आल्याने बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. सुट्टीच्या दिवशी रविवारी अनेकांनी खरेदीचा बेत आखला होता. यासाठी अनेक जण सहकुटुंब विविध वस्तू आणि साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडले.

व्यापारी आणि विक्रेते सकाळीच दुकाने उघडून ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. सकाळपासूनच रस्त्यांवरील गर्दी वाढल्याने शहरातील पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, कुंभारवाडा, रंगारगल्ली, सराफा रोड आणि शहागंज येथील रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत गर्दीचे चित्र होते. सायंकाळनंतर मुख्य बाजारपेठेत पाय ठेवायलाही जागा नव्हती. रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल सुरू होती.

सुट्टीचा दिवस सत्कारणी नवीन कपडे, फराळाचे साहित्य, मिठाई, ड्रायफ्रूट, पणत्या, आकाशकंदील, गृहउपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, गृहसजावटीच्या वस्तू तसेच प्रिय व्यक्तींना दिवाळी भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंगमधील गिफ्टची मनसोक्त खरेदी करून अनेकांनी सुट्टीचा दिवस सत्कारणी लावला.

दुष्काळामुळे ग्रामीण भागातील लोकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. मात्र, शहरातील नोकरदार आणि कामगार वर्गाला पगार व बोनस मिळाल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. दसऱ्यात यंदा चांगली उलाढाल झाल्याने दिवाळीतही चांगला व्यवसाय होण्याची आशा आहे.
- लक्ष्मीनारायण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT