Fake Talathi Recruitment pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Fake Talathi Recruitment : बोगस तलाठी भरतीचे रॅकेट राज्यभरात सक्रिय; इतर जिल्ह्यांतही दिले नियुक्तीपत्र

बोगस तलाठी भरतीचे रॅकेट हे केवळ जिल्ह्यापुरतेच मार्यादित नसून राज्यभरात सक्रिय आहे.

पुढारी वृत्तसेवा

Bogus Talathi Recruitment Racket Active Across State; Appointment letter issued in other districts also

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बोगस तलाठी भरतीचे रॅकेट हे केवळ जिल्ह्यापुरतेच मार्यादित नसून राज्यभरात सक्रिय आहे. त्याबाबत आता जिल्हा प्रशासनाकडे विविध जिल्ह्यांतून तक्रारी प्राप्त होत असून यवतमाळसह इतर जिल्ह्यांमध्येही या टोळीने अशीच बोगस भरती राबवून बनावट सह्यांचे नियुक्तीपत्रे अदा केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. या रॅकेटमध्ये जिल्हा प्रशासनातील कोणी सहभागी आहे का, या दृष्टीनेही वरिष्ठ अधिकारी शोध घेत आहेत.

जिल्ह्यात ९ जून रोजी परस्पर बोगस तलाठी भरती झाल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या बोगस भरतीतील तलाठ्यांना तहसील कार्यालयाच्या परिसरातच जिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरींचे नियुक्तीपत्रासोबतच लॅपटॉप देण्यात आले. त्यामुळे संपूर्ण महसूल यंत्रणेत खळबळ माजली होती. सकर्ततेची पावले उचलून प्रशासनाने फसवणूक झालेल्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले होते. यानंतर जिल्ह्यातील सुमारे १० ते १२ जणांनी प्रशासनाशी संपर्क साधला. सुमारे २० हून अधिक जणांची जिल्ह्यात या बोगस तलाठी भरतीच्या रॅकेटने फसवणूक केल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणात प्रशासकीय यंत्रणेतील कोणी आहे का, त्याबाबत शोध सुरू आहे. परंतु, यात कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने गुन्हा दाखल करणेही शक्य झाले नाही. अखेर दोन महिन्यांनंतर १३ ऑगस्ट रोजी खुलताबादच्या मावसाळा येथील अजीनाथ वरकड व सिडको एन २ मधील अक्षय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देऊन फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली.

त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच अशा प्रकारची फसवणूक या टोळीने राज्यभरात केल्याची माहिती गुरुवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. यात एक प्रकरण यवतमाळचे असून तेथेही असाच प्रकार झाला आहे. त्यामुळे हे बोगस तलाठी भरतीचे हे रॅकेट राज्यभरात सक्रिय आहे.

प्रशासनातून कोण ?

राज्यभरात हे बोगस भरतीचे रॅकेट सक्रिय आहे. या टोळीमध्ये प्रशासकीय यंत्रणेतून कोणी सहभागी आहे का, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाचा गोपनीय पद्धतीने शोध सुरू आहे. मात्र अद्याप काहीही माहिती यंत्रणेच्या हाती लागलेली नाही.

पोलिसांकडून हरबकला अटक

बोगस तलाठी भरती प्रकरणात छत्रपती संभाजीनगरसोबतच यवतमाळमध्येही आरोपी बाबासाहेब लक्ष्मणराव हरबक याच्यासह रमेश हाके, लोंढे या चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून बाबासाहेब हरबकला अटक करण्यात आली आहे.

आरोपी तो मी नव्हेच्या पवित्र्यात

या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने बाबासाहेब हरबक आणि त्याच्या साथीदाराविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी हरबक आता तो मी नव्हेच्या पवित्र्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याने आपलीही फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज शहरातील एका पोलिस ठाण्यात दिल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT