Sambhajinagar News : कर थकबाकीदारांना दणका, २६ मालमत्ता सील File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कर थकबाकीदारांना दणका, २६ मालमत्ता सील

९१ लाखांची कर वसुली : मोठ्या थकबाकीदारांविरोधात मनपाची धडक मोहीम

पुढारी वृत्तसेवा

Blow to tax defaulters; 26 properties sealed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मोठ्या करदात्यांविरोधात महापालिकेने सलग तिसऱ्या आठवड्यात कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, शहरातील विविध भागांतील २६ मालमत्तांवर गुरुवारी (दि.२) सीलची कारवाई करण्यात आली, तर त्याच दिवशी ६४ लाख ९१ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात प्रशासनाला यश आले.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार शहरातील दहा झोनमध्ये एकाचवेळी विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात आली. मागील मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर यावेळीही मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त विकास नवाळे यांनी प्रत्येक झोनमधील १५ ते २० मोठ्या थकबाकीदारांची स्वतंत्र यादी तयार करून कर वसुली पथकांना कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार दिवसभर विविध भागांत सीलची कारवाई सुरू होती. अनेक थकबाकीदारांनी मालमत्ता सील होऊ नये म्हणून तात्काळ थकबाकी भरून प्रतिसाद दिला. सील करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये झोन क्रमांक १ आघाडीवर राहिला. या झोनमध्ये सर्वाधिक १० मालमत्ता सील करण्यात आल्या. झोन २ मध्ये चार, झोन ३ मध्ये दोन, झोन ४ मध्ये एक, झोन ५ मध्ये तीन, झोन ६ मध्ये दोन, झोन ७ मध्ये एक, झोन ८ मध्ये एक आणि झोन १० मध्ये दोन मालमत्तांवर सील ठोकण्यात आले.

झोन ९ मध्ये मात्र कोणतीही सीलची कारवाई झाली नाही. या वसुली मोहिमेत झोन १० अव्वल ठरला. या झोनमध्ये २९ लाख रुपयांचा कर जमा झाला. त्यापाठोपाठ झोन ७मध्ये १५.५९ लाख, झोन ९ मध्ये १२.१९ लाख, झोन ४ मध्ये ४.६१ लाख, झोन ३ मध्ये १.९४ लाख, झोन ६ मध्ये १ लाख आणि झोन २ मध्ये ५८ हजार ७१२ रुपयांची वसुली झाली.

झोन १, ५ आणि ८ मध्ये मालमत्ता सील करण्यात आल्या असल्या, तरी त्या दिवशी कर वसुली झाली नाही. महापालिकेने मोठ्या थकबाकीदारांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. थकबाकीदारांनी स्वयंस्फूर्तीने कर भरून दंडात्मक कारवाई टाळावी, अन्यथा मालमत्ता सील करण्यासह पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT