BJP official attacked over ticket distribution
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिंचखेडा (खुर्द) येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष भागिनाथ काळे यांच्यावर औराळा येथील गुंडांनी धारदार लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सुभाष काळे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी दि. २४ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे हे विलास भोजणे यांच्यासह भाजपचे गट-गणाचे उमेदवार यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुजराणे यांच्या पेट्रोल पंपावरील कार्यालयात चर्चा करण्यासाठी गेले होते. चर्चा सुरू असताना औराळा येथील अंबादास तातेराव खवळे व रामदास तातेराव खवळे हे दोघे तेथे आले. पंचायत समितीच्या तिकीट वाटपावरून त्यांनी सुभाष काळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिकीट देणे अथवा न देणे हे त्यांच्या अधिकारात नसल्याचे सांगत उपस्थितांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ करू नये, असे सांगितले.
त्यानंतर सुभाष काळे यांना वाहनात बसून निघून जाण्यास सांगण्यात आले. ते वाहनाकडे जात असतानाच अंबादास खवळे व रामदास खवळे या दोघांनी लोखंडी रॉडने सुभाष काळे यांच्यावर हल्ला चढवत बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुभाष काळे यांच्यावर सध्या कन्नड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, रात्री उशिरापर्यंत देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आधीही शिवीगाळ व मारहाणीचे प्रकार
रामदास तातेराव खवळे यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी २२ जानेव-ारी रोजी कन्नड उपविभागीय कार्यालयात जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुभाष काळे, माजी पंचायत समिती माजी उपसभापती सुनील निकम तसेच महेश मलदुडे यांना शिवीगाळ केली होती. तसेच २३ जानेवारी रोजी दुपारी रामदास खवळे यांनी सुनील निकम यांच्यावर काठीने हल्ला करून त्यांची गच्ची धरून शिवीगाळ केल्याची तक्रार महेश मलदुडे यांनी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे दिली आहे. कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षाचा प्रश्न असतो माझा काहीही संबंध नसताना संबंधित लोकांनी मला मारहाण केली. या प्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुभाष काळे यांनी केली आहे.