BJP finalizes strategy for local body elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांच्या प्रचाराला गती देण्यासाठी शहरातील सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (दि.१२) पक्षाच्या विभागीय कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने रणनिती ठरवली असून शुक्रवारी भाजप नगरसेवकांची मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीतील विजयासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच बूथस्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करणे, कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढविणे, मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी प्रभावी प्रचारयोजना राबविणे यासह निवडणूक व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.
पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक स्तरावरील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. निवडणुकीत पक्षाचा संदेश प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, माजी आमदार संजय केनेकर, महापौर समीर राजुरकर, माजी महापौर बापू घडामोडे, प्रदेश सचिव प्रवीण घुगे, बसवराज मंगरुळे, हर्षवर्धन कराड, छाया खाजेकर, रामेश्वर भादवे, ताराचंद गायकवाड यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविकांची उपस्थिती होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.