महामानवाला अभिवादन करण्यासाठी पैठणगेट परिसरात उसळलेला जनसागर,  (सर्व छाया : सचिन लहाने, बाळू देशमुख)
छत्रपती संभाजीनगर

Bhim Jayanti celebration : माह्या भिमानं... भिमानं माय सोन्यानं भरली ओटी...

शहरात भीमसैनिकांचा अभूतपूर्व जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लेझर शोचा झगमगाट, डीजेच्या दणदणाटावर वाजणाऱ्या भीमगीतांत थिरकणारी तरुणाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आलेल्या लाखो आबालवृद्धांचा उत्साह, ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या मंचावर होणारे स्वागत व बाबासाहेबांचा जयघोष, अशा निळ्या वातावरणात मंगळवारी (दि. १४) निघालेल्या भीमजयंतीच्या मिरवणुकीने क्रांती चौक ते भडकलगेट परिसर गजबजून गेला होता. तर माह्या भिमानं... भिमानं माय सोन्यानं भरली ओटी या गाण्यावर महिला, तरुण, तरुणी व बच्चेकंपनीही थिरकत होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकलगेट येथील पुतळ्यास रणरणत्या उन्हात अभिवादनासाठी दिवसभर भीमसैनिकांची गर्दी उसळली होती. सायंकाळी उन्हाचा पारा उतरल्यानंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी वस्त्या वस्त्यांमधून वाहने येत होती.

सायंकाळी आठ वाजेनंतर क्रांती चौक, नूतन कॉलनी, सिल्लेखाना, पैठणगेट, सिटी चौक, भडकलगेट हा मार्ग आंबेडकरी जनतेच्या गर्दीने फुलून गेला. मिटमिटा, पडेगाव, सातारा-देवळाई, शिवाजीनगर, चिकलठाणा, मुकुंदवाडी भागातील मिरवणुकाही रात्री ९.३० वाजेदरम्यान क्रांती चौकात वाजत-गाजत दाखल झाल्या. विविध मंचांवर भीमसैनिकांचे स्वागत करण्यात येत होते. यावर्षी अनेक स्टेजवर प्रकाश योजनेवरच जास्त भर दिल्याने मिरवणुकीत देखाव्यांची कमरता जाणवली. ब्लू स्टार प्रतिष्ठानच्या वतीने बुद्धगया वाचवा यावर देखावा केला होता. हा देखावा अनेकांना भावला.

क्षणचित्रे...

गतवर्षीचा अनुभव पाहता अनेकांनी कानात कापसाचे बोळे घातलेले होते. डीजेचे कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण दिसून आले.अवीट गोडीच्या चालींवरीलभीमगीतांबर तरुणाईने ठेका ठरला होता. मिरवणुका रात्री ९ वाजेपर्यंत क्रांती चौकात दाखल झाल्या. अनेक संघटनांनी नाश्ता व पाणी वितरित केले.

मिरवणुकीतही आतषबाजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष-संघटनांच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून बाबासाहेबांना अभिवादन केले गेले, रविवार व सोमवार दोन्ही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांची रेलचेल होती, धूम होती. मिरवणुकीला सुरुवात होताच तरुणाईने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीतांवर ठेका धरला. धुर्द-बेधुद होऊन ते नाचत होते. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आबासाहेबांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. रविवारी मध्यरात्रीपासूनच आतषबाजी, विद्युत रोषणाई व आधी भीमगीतांच्या कार्यक्रमांनी जयंती उत्सवाला दणदणीत सुरुवात झाली. मिरवणुकीतही फटाक्यांची आतषचाजी सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT