पैठण: वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असलेल्या पैठण नगरीत, नाथषष्ठी यात्रा सोहळ्याच्या मंगल पर्वावर एका भावपूर्ण परंपरेची सांगता झाली. साक्षात पांडुरंगाने 'श्रीखंड्या'चे रूप घेऊन जिथे १२ वर्षे पाणी भरण्याची सेवा केली, तो श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील पवित्र रांजण आज, शनिवारी सकाळी भानुदास-एकनाथाच्या जयघोषात पूर्ण भरला आहे.
गुरुवार, ५ मार्च रोजी तुकाराम बीज मुहूर्तावर नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले आणि रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते या रांजण पूजन सोहळ्याचा प्रारंभ झाला होता. गेल्या तीन दिवसांपासून हजारो भाविकांनी गोदावरीचे पवित्र जल या रांजणात अर्पण करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. शनिवारी सकाळी ७:५० वाजता, संतोष विठ्ठलराव कुलकर्णी (रा. लिंबूर, जि. कामारेड्डी) या नाथभक्ताने पाण्याची घागर अर्पण केली आणि हा ऐतिहासिक रांजण काठोकाठ भरला.
असे मानले जाते की, संत एकनाथांच्या भक्तीला भुलून पांडुरंग 'श्रीखंड्या' बनून त्यांच्या घरी पाणी भरत असत. याच स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरवर्षी हा रांजण भरण्याचा उत्सव साजरा केला जातो. रांजण भरण्याचा मानकरी ठरल्याबद्दल संतोष कुलकर्णी यांचा नाथवंशज आणि संस्थानाधितींच्या हस्ते 'नाथा घरचा प्रसाद' व नारळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी रघुनाथबुवा गोसावी, रावसाहेब महाराज गोसावी, श्रीकृष्ण कुलकर्णी, रवींद्र महाराज पांडव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.