छत्रपती संभाजीनगर खंडपीठ pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

NEET 2026 court case : ‘नीट’ निकालातील घोळावर विद्यार्थ्याची छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका

अपेक्षित गुण ५२२, स्कोअरकार्डमध्ये फक्त ९५ : उद्या सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : देशभरात ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षेतील कथित गैरव्यवहारावरून वाद सुरू असतानाच, आता हा मुद्दा न्यायालयातही पोहोचला आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी शुभम नितीन गवते याने आपल्या निकालात गंभीर तफावत असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

उत्तरपत्रिका (ओएमआर) आणि अधिकृत उत्तरतालिकेनुसार ५२२ गुण मिळणे अपेक्षित असताना अधिकृत स्कोअरकार्डमध्ये केवळ ९५ गुण दाखवण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने गुरुवारी (दि. २३) सुनावणी निश्चित केली आहे.

याचिकाकर्त्याचे वकील ॲड. महेंद्र गंडले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, १६ जुलै रोजी ‘एनटीए’ने ‘नीट २०२६’ परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकालानंतर विद्यार्थ्याने स्वतःची ओएमआर शीट आणि अधिकृत उत्तरतालिका तपासली असता त्याला ५२२ गुण मिळणे अपेक्षित असल्याचे दिसून आले.

मात्र, ‘एनटीए’ने जारी केलेल्या स्कोअरकार्डमध्ये त्याला केवळ ९५ गुण देण्यात आले आहेत. विद्यार्थ्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून आणि पुराव्यांवरून त्याच्या दाव्यात तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

‘एनटीए’कडे सातवेळा तक्रार; प्रतिसाद नाही

शुभम गवतेने निकालातील तफावत लक्षात आल्यानंतर ‘एनटीए’कडे सातवेळा ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली. तसेच, अनेकवेळा दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. ई-मेलला १६ तासांच्या आत उत्तर देऊन तक्रारीचे निराकरण करू, असे ‘एनटीए’कडून सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे.

न्यायालयात काय केली मागणी?

याचिकेद्वारे विद्यार्थ्याने आपल्या निकालाची फेरतपासणी करावी, गुणांमधील कथित तफावतीची चौकशी करावी आणि न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायालयासमोर उपलब्ध कागदपत्रे आणि पुरावे सादर करून विद्यार्थ्याची बाजू मांडण्यात येणार असल्याचे ॲड. महेंद्र गंडले यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT