Barricading work at Grishneshwar Temple for the month of Shravan
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता, मंदिर विश्वस्त समिती व प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरू आहे. यंदा श्रावणमास गुरुवार (दि.१३) पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर १२ वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दर्शनाच्या सुलभ नियोजनासाठी मंदिर संस्थान व पोलिस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात बॅरिकेटिंग (रांगेचे लोखंडी कठडे) उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये देशभरातून लाखो शिवभक्त घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी वेरूळ येथे दाखल होतात. यामुळे परिसर शिस्तबद्ध व सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असते. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश झलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोनवणे, प्रेमसिंग जाधव, राहुल वाघमारे, राहुल दांडगे यांच्यासह पोलिस प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल झाले होते.
देवस्थानच्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने पोलिस पथकाने परिसरातील अडथळे दूर करून बॅरिकेटिंग लावण्याचे काम सुरळीत आणि पुन्हा वेगाने सुरू केले. श्रावण मासातील गर्दीचे नियोजन अत्यंत चोख राहावे यासाठी मंदिर संस्थान व पोलिस प्रशासन अहोरात्र काम करत आहे.
विक्रेते, दुकानदारांमुळे अडथळे
वेरूळ येथे बॅरिकेटिंगचे काम सुरू असताना मंदिर परिसरातील काही बेल-फूल व पूजा साहित्य विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे तसेच दुकानांमुळे बॅरिकेट्स लावण्यात अडचणी व अडथळे निर्माण झाले होते. या समस्येची दखल घेत मंदिर विश्वस्त समितीने पोलिस प्रशासनाची मदत मागितली