Bangaon Lahuki project 100 percent completed
करमाड, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बनगाव लाहुकी माध्यम प्रकल्प १९७७ साली पूर्ण झाले होते, तेव्हापासून सहा ते सात वेळेस धरण पूर्ण भरले होते. यावर्षी दमदार पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला. तालुक्यातील १५ गावांचा पाणी प्रश्न याही वर्षी मिटला आहे.
यावर्षी पावसाने महाराष्ट्रसह करमाड परिसरात जोरदार हजेरी लावल्याने पाणीच पाणी केले आहे. परिसरातील नदी नाल्याला पुर आल्याने शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. डोंगरा भागातून नदी, नाले वाहू लागले असून सर्वत्र निसर्गमय वातावरण निर्माण झाले आहे. २०२० साली लाहुकी मध्यम प्रकल्प भरला होता त्यानंतर पुन्हा या वर्षी भरला आहे. १०० टक्के भरलेल्या धरणातून पाणी प्रवाह साडव्यांतुन सुरू झाला आहे.
परिसराला वरदान म्हणून लाभलेल्या या बनगाव लाहुकी मध्यम प्रकल्पातून शेतीबरोबर करमाड, दुधड, गाढेजळगाव, शेवगा, भांबर्डा, बनगाव, जयपूर, कुबेर-गेवराई, वरुड, वरझडी, मुरुमखेडा, बडखा, शेंद्राबन, या गावांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात आतील भागात पाणीपुरवठा विहिरी असून त्या विहिरी पूर्ण भरलेल्या आहे.
पाणीपुरवठा विहिरींची पाणी पातळी वाढल्याने दरवर्षी भर उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून परिसरात पाऊस चांगला प्रमाणे पडत असल्याने बनगाव लाहुकी धरणातून पाटाव्दारे दुधड, दुधडवाडी, भांबर्डा, शेवगा, गाढेजळगाव, करंजगाव या गावांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणीपुरवठा होत असतो. यावर्षीही चांगला पाऊस झाल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चार्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
धरणाच्या सांडव्याच्या भिंतीवर काटेरी झुडपे
लाहुकी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून, या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीवर पाणी प्रवाह सुरू झाला आहे. या भिंतीवर काटेरी झुडपे, पिंपळ झाड, बाभूळ रोपटे उगवून त्याचे झाडात रूपांतर झाले आहे. झाडाच्या मुळा वाढत असल्याने भिंतीला तड्ढे जाऊन जागोजागी गळती सुरू झाली आहे. धरण पूर्ण भरलेले असून, त्या भिंतीवरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे घरणा लगत असलेले शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धरणाची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.