छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर, वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) ला अन्न सुरक्षेसंदर्भातील गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच भोवले आहे. या केंद्राचा अन्न परवाना एफडीएकडून निलंबित करण्यात आला असून, या कालावधीत खाद्यपदार्थाचे उत्पादन, विक्री करण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेंतर्गत खाद्यअन्नातील भेसळ रोखण्यासाठी धडाकेबाज मोहीम सुरू आहे. याअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) ची प्रत्यक्ष तपासणी केली होती. तेव्हा पेढीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने ४ सप्टेंबरला सुधारणा नोटीस देण्यात आली.
मात्र, त्यानंतर २९ सप्टेंबरला फेरतपासणीतही अन्न, पॅकेजिंग साहित्य व रसायनांच्या साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, खाद्यपदार्थांची नियमित चाचणीच्या नोंदी नसणे. डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे. अन्न कचरा आणि टाकाऊ वस्तूंची वेळेवर विल्हेवाट न लावणे. कीटक नियंत्रणाचे अभिलेख अद्ययावत नसणे आणि जेवणाच्या जागेत जळमटे आढळून आल्याने सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी अन्न परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.
उत्पादन, विक्री केल्यास कारवाई
निलंबन कालावधीत डोमिनोज पिझ्झा केंद्राला कोणत्याही खाद्यपदार्थाचे उत्पादन, विक्रीसाठी साठा, विक्री अथवा वितरण करण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यानी दिला आहे. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी यांना सदर पेढीवर बारीक पाळत ठेवून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.