Baby cobra rescued from a frog's clutches
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: बीड बायपास येथील हायकोर्ट कॉलनी येथील एका घरात शनिवारी (दि.१) बेडकाने बेबी कोब्राला तोंडात पकडले होते. जीव वाचवण्यासाठी बेबी कोब्रा धडपडत असल्याची माहिती मिळताच लाईफ केअर अनिमल वेल्फेअचे दाऊद शेख त्यांनी बेबी कोब्राला बेडकाच्या तावडीतून सुखरूप सुटका करून त्याची अधिवासात रवानगी केल्याची माहिती जयेश शिंदे यांनी दिली.
साप त्यातल्या त्यात कोब्रा हा उंदरासह बेडकाचाही जानी दुश्मन परंतु शनिवारी हायकोर्ट कॉलनीत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. एका बेडकाने चक्क कोब्रा (बेबी) नागालाच आपले भक्ष्य करण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी बेबी कोब्राची धडपड सुरूच होती. यादरम्यान अनिमल वेल्फेअरला माहिती मिळाल्याने त्यांच्या सदस्यांनी धाव घेत बेबी कोब्राचे प्राण वाचवले.
त्याची बेडकाच्या तावडीतून सुटका करत त्याची रवानगी त्याच्या अधिवासात केली. तसेच विभागीय आयुक्त यांचे निवासस्थान गुलशन महल येथे साप दिसल्याची माहिती गणेश पिठोरे, पुनमचंद चव्हाण सुरक्षारक्षक, संकेत पगारे यांनी शिंदे यांना दिली. शिंदे यांनी सर्पमित्र दाऊद शेख यांच्या मदतीने धामीण जातीच्या सापाला रेस्क्यू केले व सुखरूप अधिवासात सोडून देण्यात आले.