Babasaheb Patil: Will contest local body elections with great force
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात लवकरच नगरपलिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. २६) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी पाटील म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील महिलांबरोबरच तरुणांना देखील अधिक संधी दिली जाईल. मात्र यासाठी ज्याला निवडणूक लढवयाची आहे त्यांनी त्या त्या भागात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधावा, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभा राहिला आहे. जे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले होते त्यांच्यासह विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठ्या संख्येने प्रवेश करत आहे.
आगामी निवडणुकीत जुने-नवे असा भेदभाव न करता जो निवडून येऊ शकतो त्याचा प्राधान्याने विचार करण्यात येईल असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आमदार नितीन पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, शहराध्यक्ष अभिजीत देशमुख, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष अहेमद अली, डॉ. गफार कादरी, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, सुभाष सोन-वणे, संतोष कोल्हे, दत्ता भांगे, अनुराग शिंदे, अकिल शेख, अप्पासाहेब पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.