छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात अत्यंत उत्साहात साजरी होणार आहे. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. एका बाजूला अनुयायांची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जयंतीनिमित्त शहरातील बुद्धविहारे आणि विविध वसाहतींमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. शहरात एकूण ९६ पुतळ्यांजवळ अभिवादन, १५० ठिकाणी प्रतिमा पूजन आणि १०२ अभिवादन केंद्रे उभारण्यात आली आहेत. स्वागत कमानी व रोषणाईने रस्ते उजळून निघाले असून, क्रांती चौक ते औरंगपुरा, सिटी चौक या मुख्य मार्गावर सुमारे ३० भव्य स्टेज उभारण्यात आले आहेत.
दुपारी ४ वाजता क्रांती चौक येथून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक सिल्-लेखाना, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटी चौकमार्गे भडकलगेट येथे पोहोचून विसर्जित होईल. तसेच, छावणी आणि सिडको-हडको भागातून येणाऱ्या मोठ्या मिरवणुका सिटी चौक आणि बाराभाई ताजिया येथे मुख्य मिरवणुकीत सामील होतील. यावर्षी शहरात ४ मुख्य आणि २४० उपमिरवणुका निघणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी १५ पाणपोई आणि ५ मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
१४०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा मिरवणूक मार्गावर आणि संवेदनशील भागात गुन्हे शाखा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. परिमंडळ १ चे उपायुक्त पंकज अतुलकर व परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्यावर बंदोबस्ताची मुख्य जबाबदारी आहे. शहरात ३४ पोलीस निरीक्षक, १०२ सहाय्यक निरीक्षक-उपनिरीक्षक, १२३६ पुरुष अंमलदार आणि १९१ महिलाअंमलदार असा बंदोबस्त आहे. शिवाय रॅपिड अॅक्शन फोर्स आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक सज्ज आहे. सातत्यपूर्ण गस्तीसाठी पीटर मोबाईल (६८ अंमलदार), टू मोबाईल (१०२ अंमलदार) आणि १३६ बीट मार्शल तैनात आहेत. तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकही मिरवणुकीत कार्यरत राहील.
उंच ठिकाणाहून लक्ष ठेवण्यासाठी सिटी चौक आणि बाराभाई ताजिया येथे वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. कमांड कंट्रोल सेंटरमधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिरवणूक मार्गावरील हालचालींवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय शहराच्या संवेदनशील भागात ड्रोनद्वारे पेट्रोलिंग केले जाईल.
डीजेची वाहने रडारवर ; ६ नाक्यांवर तपासणी
शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी हसूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी-पॉइंट आणि वाळूज टोल नाका या ६ महत्त्वाच्या ठिकाणी २४ तास चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपकाची परवानगी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंतच देण्यात आली असून, ध्वनिमापक यंत्रांद्वारे डीजे आणि साऊंड सिस्टिमची तपासणी केली जाणार आहे. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.