छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, २१ जून रोजी शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या केंद्रावर होणार आहे. त्याआधी शनिवारी या मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये निर्णय झाल्यास पहिल्या दोन ते अडीच तासांतच निकाल घोषित होईल असे चित्र आहे. महायुतीचे सुहास शिरसाट की महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यापैकी आमदार कोण होणार याचा फैसला या मतमोजणीद्वारे होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. दोन्ही जिल्ह्यांत ६३७ पैकी ६३० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. वंचित बहुजन आघाडीच्या ४ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. याशिवाय काँग्रेसच्या एका नगरसेवकाने मतदान केले नाही. तसेच पैठण आणि भोकरदनच्या केंद्रावर प्रत्येकी एक मतदान कमी नोंदवले गेले.
सर्व तेरा केंद्रांवर सरासरी ९८.९० टक्के मतदान झाले होते. आता त्याची मतमोजणी सोमवारी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त असणार आहे. त्याआधी शनिवारी या मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली.
रिंगणात तिघे, लढत दोघांतच
औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात एकूण तीन उमेदवार होते. यामध्ये महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे आणि अपक्ष उमेदवार इसाक खान सांडू खान यांचा समावेश आहे. मात्र, यात शिरसाट आणि लोखंडे यांच्यातच खरा सामना होत असल्याचे दिसून येत आहे.
५७ कर्मचारी नियुक्त
मतमोजणीसाठी ४ टेबल असतील. या प्रक्रियेसाठी एकूण ५७अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक निरीक्षक संजय कोलते, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी व्यंकट राठोड, एकनाथ बंगाळे आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोजणी होईल.
अशी होईल मतमोजणीची प्रक्रिया
मतमोजणीची प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होईल.
सर्वात आधी बॅलेट पेपरची सरमिसळ केली जाईल.
बाद मते बाजूला काढून वैध मतांच्या 5 २५-२५ मतपत्रिकांचे गड्ढे केले जातील.
वैध मतांची संख्या निश्चित झाल्यावर विजयासाठीचा कोटा निश्चित होईल.
वैध मतांच्या ५० टक्के अधिक एक असा हा कोटा असेल.
पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल.
कोणताही उमेदवार पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करू न शकल्यास दुसऱ्या ७पसंतीची मते मोजली जातील.