Audit campaign of forest lands across the district!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
जिल्ह्यातील वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण जमिनीचा तसेच विविध कारणांसाठी इतर विभागांना हस्तांतरित करण्यात आलेल्या वन जमिनींचा सविस्तर लेखाजोखा तयार करण्यासाठी प्रशासनाने ऑडिट प्रक्रिया हाती घेतली आहे. १९८० पूर्वी आणि १९८० नंतर वन विभागाकडून देण्यात आलेल्या सर्व जमिनींची माहिती संकलित केली जात असून, संबंधित विभागांकडून त्या जमिनींचा मोबदला वसूल केला जाणार आहे. या निधीतून इतर ठिकाणी समतुल्य जमीन वनक्षेत्राखाली आणण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी याबाबत सोमवारी (दि. २३) सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मार्च अखेरपर्यंत प्रत्येक जिल्ह्याने निर्धारित नमुन्यात सविस्तर माहिती राज्य शासनाकडे सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, १९८८ च्या राष्ट्रीय वन धोरणानुसार देशाच्या एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र वन किंवा वृक्षाच्छादनाखाली असणे अपेक्षित आहे. मात्र २०२३ च्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार देशातील वनक्षेत्र केवळ २१.७६ टक्के असून, वन व वृक्षाच्छादन मिळून हे प्रमाण २५.१७ टक्के इतकेच आहे.
विविध विकासकामांसाठी जमिनींचे हस्तांतरण झाल्याने वनक्षेत्रात घट झाल्याची बाब अधोरेखित झाली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय येथे दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान तत्कालीन मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठाने सर्व राज्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
पुढील सुनावणी मे महिन्यात
१९८० पूर्वी व नंतर हस्तांतरित झालेल्या वन जमिनींचे सर्वेक्षण करून त्यांचे मूल्यांकन करावे आणि संबंधित विभागांकडून त्या जमिनींच्या बदल्यातील रक्कम वसूल करावी. वसूल झालेल्या निधीतून दुसऱ्या ठिकाणी तेवढ्याच क्षेत्राची जमीन वनाखाली आणावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची आहे. पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे.
जिल्हातील १५०० हेक्टर जमीन हस्तांतरित
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास ४८०० हेक्टर जमीन ही वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. यापैकी जवळपास १५०० हेक्टर जमीन ही विविध कारणांसाठी हस्तांतरित झाल्याची प्राथमिक माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. मात्र ही जमीन कोणाला किती देण्यात आली, याची इत्थंभूत माहिती आता गोळा केली जाणार आहे.