Ashadhi Ekadashi Chhatrapati Sambhajinagar division ST earns more income
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यातून एसटीला २ कोटी ५९ लाख ३३ हजार ५८० रुपयांचे उत्पन्न मिळाले. जादा बसच्या माध्यमातून विठूराया छत्रपती संभाजीनगर विभागाला चांगलाच पावला असून, हे उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत ९५ लाख ३९ हजार ८१८ रुपये इतके जास्त आहे.
एसटी महामंडळाने पंढरपूर यात्रेसाठी २ ते ११ जुलैदरम्यान जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या दहा दिवसांच्या कालावधीत भाविकांच्या सेवेत तब्बल १७३ बसनी सेवा दिली. या बसनी १ हजार ११६ फेऱ्या मारत ३ लाख ८२ हजार ७४५ किलोमीटरचे अंतर कापले.
या दरम्यान सुमारे ४४ हजार ९४४ भाविकांनी याचा लाभ घेतला. यातून एसटीला २ कोटी ५९ लाख ३३ हजार ५८० रुपयांचे उत्पन्न मिळाले. भाविकांना प्रवासादरम्यान चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी विविध ठिकाणी एसटीच्या अधिकाऱ्यांची नेमनूक केली होती.
१३ हजार अमृत ज्येष्ठांनी घेतला लाभ पंढरपूर यात्रेसाठी ७५ वर्षावरील भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या यात्रेनिमित्त सुमारे १२ हजार ९१७ भाविकांनी पंढरपूर वारी केली. तर ६५ वर्षावरील ९ हजार २७४ ज्येष्ठ नागरिकांनी तसेच १० हजार ५२२ महिला भक्तांनी जादा बसचा लाभ घेतला.
यात पूर्ण तिकीट काढून जाणार्या भक्तांची संख्या ११ हजार २८४ तर अर्घ्य तिकीट काढून जाणारे ९४७ भक्त असे ४४ हजार ९४४ भाविकांनी पंढरपूरची वारी केली.