Fire NOC : तब्बल ४८३ हॉटेल्सकडे फायर एनओसीच नाही File Photo
छत्रपती संभाजीनगर

Fire NOC : तब्बल ४८३ हॉटेल्सकडे फायर एनओसीच नाही

मनपा बजावणार नोटीस, शहरात अग्निशमन विभागाची शोध मोहीम सुरूच

पुढारी वृत्तसेवा

As many as 483 hotels do not even have a Fire NOC

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील हॉटेलच्या अग्निकांडानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २१३ हॉटेल्सची यादी अग्निशमन विभागाला प्राप्त झाली. त्यावर शहरात एकूण हॉटेल्स किती आहेत, असा सवाल उपस्थित करीत सोमवारपासून नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिले होते. त्यावर सोमवारी (दि.२) दिवसभरात फायर एनओसी नसलेल्या हॉटेलची संख्या २१३ हून ४८३ वर पोहोचली असून, एकाच दिवसात २७० हॉटेल्स आढळल्या आहेत.

दिल्लीच्या हॉटेलमधील अनितांडवात २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी तातडीने शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आणि लॉजच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. यात दोन दिवसांत शहरात तब्बल २१३ हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील केवळ ४ हॉटेल्सकडेच फायर एनओसी आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

तर तब्बल १७५ हॉटेल्सकडे अग्निशमन परवानाच काय तर अग्निशमन यंत्रणाही उपलब्ध नसल्याचे आढळून आले. या प्रकारानंतर महापालिकेने या सर्व हॉटेल्सला नोटीस बजावून अग्निशमन यंत्रणा सज्ज करणे, फायर एनओसी घेण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या या नोटीसला काही हॉटेल्स व्यावसायिकांनीच प्रतिसाद दिला. त्यामुळे ज्या हॉटेल्सने प्रतिसाद दिला नाही. त्यांना शेवटची अंतिम नोटीस बजावून कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला.

दरम्यान, अग्निशमन विभागाची बैठक घेत शहरातील एकूण हॉटेल्स किती, अशी विचारणा सभापती अनिल मकरिये यांनी केली. त्यात केवळ २१३ हॉटेलचाच आकडा अग्निशमन विभागाने दिला. त्यामुळे सभापती मकरिये यांनी सोमवारपासून पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश दिले. त्यात एकाच दिवसात नव्याने २७० हॉटेल्स आढळून आले आहेत. त्यामुळे अग्निशमन परवाना आणि एनओसी नसलेल्या हॉटेलची संख्या आता ४८३ वर पोहोचली आहे. या सर्व हॉटेल्स मालकांना फायर एनओसीबाबत महापालिका नोटीस बजावणार आहे. त्यावरही फायर एनओसी घेतली नाही, तर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सभापती मकरिये यांनी दिला.

ग्रहकांची सुरक्षा गरजेची शहरातील अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे या हॉटेल्समध्ये आगीच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा आवश्यक असून, त्यासाठी अग्निशमन परवाना आणि अग्निशमन यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
- अनिल मकरिये, सभापती, स्थायी समिती

महापालिकेचे उत्पन्न वाढेल

अग्निशमन परवाना सर्वच हॉटेल्सला बंधनकारक आहे. यामुळे सुरक्षेसोबतच महापालिकेचे उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे शहरभर शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT