Armed robbery at a merchant's house in Pratapnagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात चोऱ्या, घरफोड्या, लूटमार, खुनाच्या वाढत्या घटनांनंतर आता दरोडेखोरांनी शिरकाव केल्याचे समोर आले आहे. उच्चभ्रू वस्ती असलेल्या उस्मानपुरा परिसरातील प्रतापनगरमध्ये सोमवारी (दि.६) पहाटे ३:१५ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला.
एका व्यापाऱ्याच्या घरात मागच्या दाराने प्रवेश करत त्यांच्या पोटाला धारदार चाकू लावून दरोडेखोरांनी रोख रकमेसह तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लुटला. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या थरारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी संजय रामकिशन लाहोटी (५८, रा. कासलीवाल विहारसमोर, प्रतापनगर, बंगला क्र. ४) यांचा टायर रिमोल्डिंगचा व्यवसाय असून, त्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत. पहाटे २:५० च्या सुमारास पाच दरोडेखोरांच्या टोळीने सुरुवातीला लाहोटी यांच्या घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एका बंगल्यात दरोड्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे वॉचमन तैनात आणि सीसीटीव्ही दिसल्याने त्यांनी आपला मोर्चा लाहोटी यांच्या घराकडे वळवला. लाहोटी यांच्या घराच्या मागच्या बाजूला खुला प्लॉट आहे. त्यांनी कंपाउंडची तारेची फेन्सिंग कापली. त्यानंतर किचनच्या लोखंडी सेफ्टी डोअरची जाळी कापून, आत हात घालत टॉमीच्या सहाय्याने कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान, बाहेर सोलरच्या लाईटला ते सीसीटीव्ही कॅमेरा समजले आणि तो त्यांनी छतावर चढून वाळत घातलेल्या कपड्याने झाकून टाकला.
'सर्व दागिने द्या, नाही तर मर्डर करू'
घरात शिरलेल्या चार दरोडेखोरांनी थेट लाहोटी दाम्पत्याची बेडरूम गाठली. त्यांनी झोपेत असलेल्या पत्नीच्या तोंडावर हात ठेवून त्यांना उठवले. समोर हातात मोठे धारदार चाकू आणि हतोडा घेतलेले काळ्या मास्कमधील चार दरोडेखोर पाहून त्या घाबरल्या. त्यांनी पतीला आवाज देताच एकाने थेट संजय यांच्या पोटाला मोठा चाकू लावला. पोटाला दोन वेळा चाकू टोचत 'सर्व दागिने द्या, नाही तर मर्डर करू', अशी धमकी दिली. 'सोने कुठेय?' अशी विचारणा करत दरोडेखोर दागिन्यांची मागणी करू लागले. यातील दोघे तेलगू तर दोघे मोडकी मराठी बोलत होते. त्यावरून हे सीमाभागातील दरोडेखोर असावेत, रेल्वेने येऊन त्यांनी दरोडा टाकल्याचा संशय आहे.
तिजोरीतून रोकड व दागिने पळवले
भीतीपोटी लाहोटी यांनी कपाटाच्या चाव्या त्यांच्या स्वाधीन केल्या. दरोडेखोरांनी कपाटातील ३ लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याची अंगठी, साखळी आणि चांदीचे दागिने असा ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल घरातीलच एका पिशवीत भरला. घरातून निघताना दरोडेखोरांनी लाहोटी यांच्याकडील तीन मोबाईलचे 'सीमकार्ड काढले. ते बाहेर फेकून देतो, शोधून घ्या', असे सांगून निघून गेले.
'पोलिसांत तक्रार केली तर...'
जाताना त्यांनी 'बाहेर पडू नका, आम्ही इथेच राहतो, पोलिसांत तक्रार केली तर जिवे मारू', अशी धमकी दिली. घरामागील रेल्वे रुळाच्या दिशेने ते पसार झाले. विशेष म्हणजे, बाजूच्या कॅश एजन्सीच्या सुरक्षारक्षकाला आवाज आला होता, पण रिमझिम पावसामुळे त्याला काही दिसले नाही. दरोडेखोर पसार झाल्यानंतर लाहोटी यांनी पहाटे साडेचारच्या सुमारास उस्मानपुरा ठाणे गाठले.
त्यानंतर पाच वाजता पोलिस घटनास्थळी आले. फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. डीसीपी रत्नाकर नवले, एसीपी मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, संग्राम ताटे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गुन्हे शाखेची तीन पथके दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.