छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीने मनपा सफाई कर्मचाऱ्याच्या घरावर सशस्त्र हल्ला चढविला. घराचे दार न उघडल्याने टोळीने घराच्या दिशेने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि.19) सकाळी 6 वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन पटरीच्या पलीकडे शिवशाहीनगर भागात हा प्रकार घडला. सुदैवाने गोळीबारीमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
शुभम भिखूलाल जाट (रा. बीड बायपास), मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव ऊर्फ छोट्या, गोल्या ऊर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार अशी आरोपींची नावे असून, काही तासांत सातही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
फिर्यादी सचिन लाहोट (35, रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, ते महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घरी झोपलेले असताना घराच्या बाहेर शिवीगाळ व आरडाओरड करण्याचा आवाज आला. सचिन व त्यांच्या आईने खिडकी उघडून पाहिले तेव्हा शुभमसह त्याची टोळी घरासमोर हातात तलवारी, चाकू, पिस्तूल घेऊन शिवीगाळ करताना दिसले. सचिन बाहर आजा, आज तुझे खतम करना है, असे ओरडत होते. दरवाजा उघडत नसल्याने गोल्या ऊर्फ विजय धनईने मोठा दगड उचलून त्यांच्या दारावर टाकला. त्यानंतर शुभम जाटने पिस्तुलातून घराच्या छताच्या दिशेने गोळी झाडली.