Appeal to the Chief Minister for vacant posts in the Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी या तीन महत्त्वाच्या पदांवर राज्य शासनाकडून पूर्णवेळ शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भात मकरिये यांनी मंगळवारी (दि. २२) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले.
गेल्या काही दिवसांपासून मनपातील प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी तीन पदे रिक्त आहेत. यासंदर्भात सभापती अनिल मकरीये यांनी मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्र सादर केले. यात मुख्य अग्निशमन अधिकारी आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी ही पदे रिक्त असून, त्यांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असल्याचे मकरिये यांनी पत्रात नमूद केले आहे.
शहराचा वाढता विस्तार आणि वेगाने होत असलेला विकास लक्षात घेता, विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत सक्षम व पूर्णवेळ अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. यातील मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदाबाबतही मकरिये यांनी पत्रातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
महापालिका सेवा भरती नियम २०२१ नुसार हे पद प्रतिनियुक्तीचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. संबंधित अधिकारी ८ ऑक्टोबर २०२१ पासून महापालिकेत कार्यरत असून, त्यांचा तीन वर्षांचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झाल्याने बदली होणे अपेक्षित असल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याची सहाय्यक संचालकपदी पदोन्नती झाल्यानंतरही त्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचा दावाही मकरिये यांनी पत्रातून केला आहे. त्यामुळे या पदावरील नियुक्तीच्या प्रक्रियेबाबत शासनस्तरावरून कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.