Announcement that the railway station has been officially renamed as Chhatrapati Sambhajinagar from Sunday
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद रेल्वेस्थानकांवर आपले स्वागत आहे. हा आवाज कानवळणी पडला असतानाच रविवारी (दि. २६) सकाळी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर आपले स्वागत आहे. असा आवाज गुंदूर एक्स्प्रेस सुटताना ऐकू आला. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारपासून अधिकृतपणे रेल-वेस्थानकाचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याची माहिती मिळताच, अनेकांनी छत्रपती संभाजीनगर नावाची अनाऊंसमेंट आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केली.
दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद रेल्वेस्थानकाचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास अधिकृत मंजूरी मिळाली होती. तेव्हापासून नाव बदलण्याचा व इतर सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू होते. हे रविवारी पूर्ण झाले. जुन्या नावाचे सर्व बोर्ड बदलण्यात आले.
मुख्य बोर्डचेही काम सुरू असून याचे उद्घाटन मंगळवारी (दि. २८) करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली. रविवारी सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर नावाची अनाउंसमेंट सुरू करण्यात आली आहे. ही अनाऊंसमेंट छत्रपती संभाजीनगर- गुंटूर एक्स्प्रेस रेल्वेस्थानकांतून सुटताना ऐकू आली. हे नाव ऐकताच अनेकांना अत्यानंद झाला. अनेकांनी अनाऊंसमेंटची रेकॉर्डिग करून सोशल मीडियावर शेअर करत आपला आनंद व्यक्त केला.
बोर्डही झळकले, मंगळवारी उद्घाटन
औरंगाबाद रेल्वेस्टेशन हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या नावाचे बोर्ड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला झळकले आहेत. मुख्य इमारतीवरील बोर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच स्टेशनचा कोड सिपीएसएन करण्यात आला आहे., मंगळवारी खा. डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उदघाटनांनतर मुख्य इमारतीवर छत्रपती संभाजीनगरचा बोर्डही झळकणार आहे.