Tomato Price Crash
कन्नड : तालुक्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी उगवलेला टोमॅटो केवळ दोन ते तीन रुपये किलो दराने विकला जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२४) चार च्या सुमारास अचानक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे.
शेतकऱ्यांनी टोमॅटोचे क्रेट्स महामार्गावर ओतून निषेध व्यक्त केला. “खत, औषध, मजुरी, पाणी, वाहतूक खर्च सगळं भरून झालं, पण भाव मिळत नाही,” अशा घोषणा देत शेतकरी संतप्त झाले. काही शेतकऱ्यांनी बसवर चढून राज्य सरकार व शासनाचा निषेध व्यक्त केला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी शांत होण्याच्या मनस्थिती नसल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.